Tue, Nov 19, 2019 11:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सक्तीचे : सुप्रीम कोर्ट

जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सक्तीचे

Published On: Jun 17 2019 2:11AM | Last Updated: Jun 17 2019 1:10AM
मुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या  आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. अन्यथा आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला तिसर्‍या फेरीमध्ये पात्र ठरल्यास खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. तर एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास दरवर्षीप्रमाणे मुदतवाढ मिळणार नाही. प्रवेश प्रक्रिया राबवताना सर्वोच्च न्यायालयाने कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष मर्यादा घातल्या आहे. 

जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने पडताळणी प्रमाणपत्र दुसर्‍या यादीतील प्रवेश घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत.