Mon, May 25, 2020 16:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘वायू’मुळे मुंबई, सिंधुदुर्गमध्ये उधाणाचा धोका

‘वायू’मुळे मुंबई, सिंधुदुर्गमध्ये उधाणाचा धोका

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:35AM
मुंबईः विशेष प्रतिनिधी

वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात उधाणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांसाठी समुद्रकिनारे बंद ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 48 तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्यात आहेत, अशी माहिती  राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली.

अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून  13 जून रोजी या भागातील समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी होणार असल्यामुळे कोकण किनारा जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटक व स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात वायू हे चक्रीवादळ तयार झाले आहे. मुंबईपासून दक्षिण, नैर्ऋत्य दिशेने 630 किमी अंतरावर हे चक्रीवादळ पुढे सरकत असून ते आणखी तीव्र होणार आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे दोन दिवसांत वार्‍याचा वेग वाढून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.