Tue, Jul 23, 2019 02:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिकाऊ आरक्षण देणार : मुख्यमंत्री

टिकाऊ आरक्षण देणार : मुख्यमंत्री

Published On: Jul 31 2018 8:29PM | Last Updated: Aug 01 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय आरक्षण दिले तर ते एक दिवसही टिकणार नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर व तांत्रिक बाबी पूर्ण करून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यात येईल आणि ते आपलेच सरकार देईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केली. तांत्रिक बाजू समजून न घेता आक्रोश निर्माण करून आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाही, तर शांतता प्रस्थापित करूनच हा प्रश्‍न सुटेल. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलन थांबवून शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाला सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण दिले होते; पण नंतर ते कायम राहिले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी मराठा आरक्षणाचा कायदा केला; पण हा कायदा उच्च न्यायालयात टिकू शकला नाही.

आरक्षणाचा खटला न्यायालयात सध्या सुरू आहे. जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन कायदा होत नाही, तोपर्यंत आरक्षण टिकू शकणार नाही. काही लोक आरक्षणासाठी वटहुकूम काढण्याची मागणी करीत आहेत. तसा वटहुकूम काढता येईल. मात्र, आयोगाचा अहवाल न घेता आणि तांत्रिक बाजू पूर्ण न करता वटहुकूम काढला, तर तो एक दिवसही टिकणार नाही. आम्हाला मराठा समाजाची फसवणूक करायची नाही, तर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे आणि हे आरक्षण आम्हीच देऊ. 

राज्यात सुरू असलेली जाळपोळ आणि आत्महत्येच्या घटना या व्यथित करणार्‍या आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला लवकर अहवाल तयार करण्याबाबत विनंती केली असून, आयोगाचे अध्यक्षही आयोगाचे काम वेगाने करीत आहेत. तेव्हा मराठा समाजाने संयम बाळगावा. केवळ भावनेत वाहून गेलो, तर आक्रोश निर्माण होईल; पण कायदेशीर बाजू तशाच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

ज्यांना आमचे म्हणणे समजते ते आज दबावापोटी बोलत नाहीत; पण ज्यांना आज आमचे म्हणणे पटत नाही त्यांनाही भविष्यात ते खरे होते हे पटेल, असा ठाम विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्‍त केला. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विवेकबुद्धीने काम करीत असल्याने या परिस्थितीतही मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशेने पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाराजी व्यक्‍त केली. स्मारकाच्या सर्व परवानग्या राज्य सरकारने मिळविल्या आहेत. हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी माहिती देतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची पुतळ्यामुळे मोजता येणार नाही. पुतळ्याच्या उंचीवरून सुरू असलेले राजकारण हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.