Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावातील कापड गिरणीला आग

गोरेगावातील कापड गिरणीला आग

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:36AMजोगेश्‍वरी : वार्ताहर

गोरेगाव पूर्व, ओबेरॉय मॉलजवळील इटालियन इंडस्ट्रियल इस्टेटमधील पारेख कपडा मिलला बुधवारी लागलेल्या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले. अग्‍निशमन दलाने सात तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व मशीनरी, कच्चामाल, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. सकाळी सातच्या दरम्यान आग लागल्यावर सुमारे अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कपड्याच्या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

कपड्यावर प्रिंटिंग, डिझाइन, फिल्टर अशी विविध कामे येथे केली जात. सकाळी आठ वाजता कामगार कामासाठी मिलमध्ये दाखल व्हायचे. या घटनेमुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत.  गोदामात मोठ्या प्रमाणात कपड्याचा साठा असल्याने आग संपूर्ण गोदामात पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवांना आग विझवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारतीबाहेर अनधिकृत शेड बांधण्यात आल्यामुळे आग विझवण्यास विलंब झाला. दहाच्या दरम्यान पालिकेच्या पी.दक्षिण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने येथील बांधकाम पाडले. यावेळी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

पहिल्या माळ्यावर पारेख कपडा मिल असून दुसर्‍या माळ्यावर वस्त्र क्रियेशन ही कंपनी आहे. जवानानी 2 वाजून 40 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, 6 पाण्याचे जंबो टँकर, तीन अ‍ॅम्ब्युलन्स, एक फायर अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी होते.

सुदैवाने या मिलमध्ये एकही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून  पोलीस तपास करत आहेत. महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.