मुंबई मेट्रो-3 साठी सिंधुकन्येच्या डिझाईनची निवड!

Last Updated: Nov 19 2019 1:34AM
Responsive image


दोडामार्ग : प्रतिनिधी 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो-3 डिझाईन प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागांतून प्राप्त असंख्य प्रोजेक्टमधून आर्किटेक्ट श्रेया गवस हिच्या प्रोजेक्टची 12 तज्ज्ञांच्या निवड समितीने सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून निवड केली. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोडामार्ग-पिकुळे गावचे रहिवासी तथा माजी प्रशासकीय अधिकारी व सिडको सल्लागार  मोहन गुणाजी गवस यांची श्रेया ही कन्या आहे.

मुंबई शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, भरमसाट वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन एमएसआरसी मुंबईने शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आहे. मुंबईतील जागेची समस्या विचारात घेता या प्रकल्पाअंतर्गत येणारी मेट्रो स्टेशन्स व तेथील परिसर कसा असावा, ती तयार करताना कोणत्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणे शक्य आहे याविषयीचे अभ्यासपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रस्ताव विविध शैक्षणिक संस्था, आर्किटेक्ट यांच्याकडून मागविण्यात आले होते.

आर्किटेक्ट श्रेया गवस हिने सन 2017 साली आर्किटेक्टची मुंबई विद्यापीठाची पदवी प्रथम श्रेणीत संपादित केली असून सध्या ती मुंबई येथे मास्टर ऑफ आर्किटेक्टच्या पदव्युत्तर शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुडाळ इंग्लिश मीडियम शाळेत झाले.  आर्किटेक्ट कु. श्रेया गवस ही सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे गावची सुकन्या आहे. तिची बहीण स्नेहल गवस हिने अमेरिकेतील शिकागो येथे डेटा सायन्स यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ती सध्या शिकागो येथे एका आंतरराष्ट्रीय आय.टी. कंपनीत डेटा सायंटिस्ट या पदावर  कार्यरत आहे. कु. श्रेया हिने मेट्रो-3 डिझाईन प्रोजेक्टमध्ये सुचविलेले प्रस्ताव आणि सूचना मेट्रो-3 स्टेशन तयार करताना विचारात घेण्यात येणार असल्याने, तिने अतिशय मेहनत घेऊन अभ्यासपूर्णरितीने तयार केलेल्या या प्रोजेक्टचे निवड समितीने कौतुक केलेे. 

पिकुळेच्या श्रेया गवसचा प्रोजेक्ट स्पर्धेत ठरला सर्वोत्कृष्ट  

कॉर्पोरेशनने केलेल्या आवाहनाप्रमाणे, त्यांच्याकडे प्राप्त  असंख्य प्रोजेक्टची या क्षेत्रातील 12 तज्ज्ञांच्या समितीकडून छाननीअंती 19 प्रोजेक्टचा अंतिम निवडीसाठी विचार करण्यात आला. या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 19 प्रोजेक्टचे संबंधित आर्किटेक्ट यांना मुलाखतीसाठी बोलावून त्यांच्या प्रस्तावांचे सादरीकरण बी.के.सी. मुंबई येथे समितीसमोर करण्यात आले. 

या सर्व स्पर्धकांमधून आर्किटेक्ट श्रेया गवस हिने सादर केलेल्या प्रस्तावाची सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून निवड समितीने निवड केली.  या बद्दल तिला 22 नोव्हेंबर रोजी मुंबई बीकेसी येथील एमएमआरसी सभागृहात आयोजित  ग्रँड फिनाले  कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या समोर तिला प्रोजेक्टचे सादरीकरण आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.