Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुकल्यांना टोचणारा मानसिक रुग्ण ताब्यात

चिमुकल्यांना टोचणारा मानसिक रुग्ण ताब्यात

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:46AMठाणे : प्रतिनिधी 

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूल शाळेतील तीन लहान विद्यार्थ्यांना काही तरी धारदार पिनसारखी वस्तू टोचणार्‍या युवकाचे सीसीटीव्ही फुटेज ठाण्यात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी हे कृत्य करणार्‍या 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. 

पदवीधर असलेला हा युवक मानसिक आजाराने त्रस्त असून वडिलांनी ओरडल्यामुळे त्याने तीन-चार विद्यार्थ्यांना अशाप्रकारे टोकदार वस्तू टोचून पळ काढल्याची कबुली त्याने नौपाडा पोलिसांकडे दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली.

सोमवारपासून शाळेच्या आवारात तसेच, टेकडी बंगला भागात एक युवक काही शाळकरी मुलांना टाचणीने टोचून पळत असल्याचे प्रकार घडले होते. पालकांसमवेत असलेल्या मुलांनाही हा युवक टोचत असल्याने पालकांमध्ये रोष पसरला होता. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती. या टाचणी टोचल्याबाबतचे मेसेज सोशल मीडियामध्ये पसरल्याने शहरात अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र,याबाबत कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. तरीही नागरिकांमध्ये वाढणारा रोष लक्षात घेऊन नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून या युवकाला बुधवारी ताब्यात घेतले. तो एका व्यावसायिकाचा मुलगा असून वडील ओरडल्यामुळे त्याने असे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.