होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुसर्‍या पत्नीला आई म्हणत नाही म्हणून मुलाची हत्या

दुसर्‍या पत्नीला आई म्हणत नाही म्हणून मुलाची हत्या

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

वारंवार समजूत घालूनही दुसर्‍या पत्नीला आई म्हणत नसलेल्या इम्रान सलीम शेख (22) या मुलाची पित्याने कैचीने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा डोंगरी परिसरात घडली. पळून गेलेल्या सलीमअली इब्राहिम शेख ऊर्फ सलीम मद्रासी (45)या आरोपी पित्याला शनिवारी सकाळी डोंगरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.  त्याला येथील लोकल कोर्टाने 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सलीम शेख हा डोंगरीतील नवरोजी हिल रोडवरील जुबेदा मेन्शन इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅट क्रमांक बारामध्ये त्याची पहिली पत्नी परवीन आणि मुलगा इम्रान याच्यासोबत राहत होता. सलीमने दुसर्‍या महिलेशी लग्न केले होते, तिला त्याने दुसर्‍या फ्लॅटमध्ये ठेवले होते. या कारणावरून पिता-पुत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यामुळे इम्रान हा सायन येथे राहणारी त्याची बहीण रुक्साना हिच्याकडे राहण्यासाठी गेला होता.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता तो डोंगरी येथील राहत्या घरी आला. यावेळी त्याने आईकडे पैसे मागितले. मात्र घरी असलेल्या सलीमने त्याला पैसे देण्यास नकार दिला. माझ्या दुसर्‍या पत्नीला आई समज, तरच तुला पैसे मिळतील आणि इथे राहता येईल असे त्याने त्याला सांगितले. ‘ठेवलेल्या स्त्री’ या शब्दामुळे या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सलीमने इम्रानच्या गळ्यावर कैचीने वार केले.

रक्तबंबाळ  इम्रानला त्याची आई परवीन आणि  रहिवाशांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले.उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. डोंगरी पोलिसांसह एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परवीनने 

दिलेल्या जबानीवरून पोलिसांनी सलीम शेखविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला. शोधमोहीम सुरू असताना  त्याला शनिवारी सकाळी वीर संभाजी मैदान परिसरातून डोंगरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले.