Sun, Jun 16, 2019 12:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जव्हारमध्ये मुलाचा बुडून मृत्यू

जव्हारमध्ये मुलाचा बुडून मृत्यू

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 12:49AMजव्हार : वार्ताहर

गावात असलेल्या पाणीटंचाईमुळे 6 कि.मी.अंतरावरील नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सातवर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जव्हार तालुक्यातील सारसूनपैकी मुहूपाड्यात शुक्रवारी घडली. अजय रघुनाथ पारधी (7) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, मुलाचे आई-वडील रोजगारासाठी ठाणे येथे स्थलांतरित झाले असून त्यांना याबाबतची माहिती शुक्रवारी सांयकाळी मिळाली. मुलाचा मृत्यू पाणीटंचाई आणि रोजगारासाठी स्थलांतरित झाल्यामुळेच झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

सारसूनपैकी मुहूपाड्यात पाणीटंचाई असल्याने 7 वर्षीय अजय रघुनाथ पारधी हा इतर मित्रांसोबत 6 कि.मी अंतरावरील गवटका गावाजवळील लेंदी नदीवर आंघोळीसाठी  गेला होता. आंघोळ करताना तो पाण्यात बुडाला. ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. जव्हार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह कुुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

मृत्यूचा शासन जबाबदार : ग्रामस्थांचा आरोप

पाणीटंचाई आणि पाड्यात रोजगार नसल्यामुळे त्या मुलाचे आई-वडील दोघेही रोजगाराठी ठाणे येथे गेले होते. मुहूपाड्यात रोजगार असता, तर त्याचे आई-वडील ठाणे शहरात कामधंद्यासाठी गेले नसते. त्यामुळे अजयच्या मृत्यूला शासनच जबाबदार असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

13 दिवसांपूर्वी आला होता केवळ एक टँकर

मुहूपाडा ग्रामस्थांनी 25 दिवसांपूर्वी मासिक सभेत विषय घेवून पिण्याच्या पाण्यासाठी जव्हार तहसीलदार व गटविकास कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर 13 दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा एक टँकर आला, तोही रात्री 10 वाजता. मात्र त्यानंतर पाण्याचा टँकर आलाच नाही. जर पाण्याचा टँकर वेळेवर आला असता, तर कदाचित ही मुले आंघोळ करायला नदीवर गेली नसती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.