Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळ समर्थक चढणार ‘कृष्णकुंज’ची पायरी

भुजबळ समर्थक चढणार ‘कृष्णकुंज’ची पायरी

Published On: Feb 03 2018 11:25AM | Last Updated: Feb 03 2018 11:25AMनाशिक : प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी त्यांचे समर्थक ठिकठिकाणी ‘अन्याय पे चर्चा’ घेत असून, त्यास सर्वपक्षीय त्यांचा प्रतिसाद लाभत आहे. या मोहिमेचे स्वरूप आणखी व्यापक  करण्याची रणनीती आखण्यात आली  असून, भुजबळ समर्थक सोमवारी (दि.5) महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांची भेट  घेणार आहेत.

ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ची  पायरी चढून भुजबळ समर्थक ‘अन्याय  पे चर्चा’ करणार आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे व छगन  भुजबळ यांचे राजकीय हाडवैर जगजाहीर आहे. महापालिका असो विधानसभा निवडणूक दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा खरपूस समाचार घेतला होता. मनसेप्रमुखांनी महापालिका निवडणुकीत भुजबळांची केलेली नक्‍कल व विधानसभा निवडणुकीत मफलरवरची टीका भुजबळांच्या जिव्हारी लागली  होती. परंतु मधल्या काळात भ्रष्टाचार प्रकरणामुळे भुजबळ तुरुंगात आहेत तर, निवडणुकीतील अपयशामुळे राज ठाकरे हे विजनवासात. भुजबळ यांच्यावर अन्याय होतअसल्याची भावना त्यांच्या  समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी जनआंदोलन उभारत ‘अन्याय पे  चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास जिल्ह्यातली राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपा नेत्यांचे समर्थन  मिळत आहे.

आता राज्यस्तरावर ‘अन्याय पे चर्चा’ घेतली जाणार आहे.  राजकीय वैर विसरून भुजबळ समर्थक आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ‘कृष्णकुंज’वर जाऊन भुजबळ समर्थक ‘अन्याय पे चर्चा’  करणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे   काय भूमिका मांडतात, भुजबळांसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार का, याकडे लक्ष लागून आहे. भुजबळ समर्थकांची रविवारी (दि.4) पंचवटीत  बैठक होणार  असून, हे अभियानास राज्यातील कानाकोपर्‍यात कसे पोहचवता येईल, याबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.

भुजबळांनी दिली संमती

जामीन मिळावा यासाठी भुजबळांनी मुंबई न्यायालयात अर्ज केला होता. त्याची मागील  आठवड्यात सुनावणी होती. त्यावेळी समता परिषदेच्या नेत्यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे  यांची भेट घेणार  असल्याचे सांगितले. भुजबळांनीही ‘कृष्णकुंज’वर ‘अन्याय पे चर्चा’ घेण्यास संमती दिली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही माहिती देण्यात आली. मनसेप्रमुखांनी ग्रीन सिग्‍नल दिल्याने  भुजबळ समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.