Thu, Jul 18, 2019 02:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनादेश न वटल्याने २६ कोटींच्या भरपाईचे आदेश

धनादेश न वटल्याने २६ कोटींच्या भरपाईचे आदेश

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:40AMठाणे : वार्ताहर

रहिवासी क्षेत्राचा (60 एकर) विकास करण्यासाठी केलेला करार रद्द करत घेतलेल्या अनामत रकमेचा परतावा करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाचे उल्हासनगर प्रथमवर्ग दंडाधिकारी आर. डी. चौगले यांनी सोमवारी संस्था आणि तिच्या सहा भागीदारांना दोषी ठरवत एक वर्षाचा कारावास आणि तक्रारदाराला 26 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. नुकसानभरपाईची रक्कम सर्व भागीदारांनी समप्रमाणात द्यायची असून ती देण्यास असमर्थ ठरल्यास 3 महिन्यांची अतिरिक्त कैदही सुनावण्यात आली आहे. 

विनायक इंटरप्राइझेस व सहा भागीदार विरल भानजी पटेल, मनसुख पटेल, भावीण जीव पटेल, राव हळवे, विनय कुमार कोठारी आणि अभिजीत ए. गोस्वामी यांचा तक्रारदार माधव कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक गोपी माधवदास रोचलानी यांच्यात 15 मे 2006 रोजी 60 एकर रहिवासी क्षेत्र असलेल्या जागेचा विकास करण्याचा करार 85 कोटी रुपयांमध्ये निश्चित झाला होता. विनायक इंटरप्रायझेस यांना माधव कन्स्ट्रक्शनद्वारे 8 कोटी 50 लाखांची रक्कम देण्यात आली. मात्र, काही काळानंतर विनायक इंटरप्रायझेस व सहा भागीदारांनी हा करार रद्द केला. त्याबदल्यात  माधव कन्स्ट्रक्शनकडून घेतलेली रक्कम नफ्यासह परत करण्याचे आश्वासन देत, त्यांना 16 कोटी 50 लाखांचे दोन धनादेश अनुक्रमे 18 ऑगस्ट,2008 आणि 1 ऑक्टोबर 2008 ला माधव कन्स्ट्रक्शनचे मालक रोचलानी यांना दिले. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. 

याप्रकरणी ठाणे न्यायालयात रोचलानी यांनी याचिका दाखल केली होती. हे प्रकरण ठाणे न्यायालयाचे उल्हासनगर प्रथमवर्ग न्यायालयाचे दंडाधिकारी आर. डी. चौगले यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. सरकारी वकील जयदीप ठक्कर आणि जे. एम. गवळी यांनी न्यायालयात तक्रारदार राचलानी यांच्यावतीने युक्तीवाद करीत करारनामे, बाऊंस झालेले धनादेश सादर केले. तर  विनायक इंटरप्रायझेसतर्फे किशोर भाटिया, अमित कसबे, टी. के. सिन्हा आणि सुनीता कांबळे यांनी युक्तीवाद केला. न्यायालयासमोरील दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरीत न्यायालयाने तक्रारदाराला 26 कोटी रुपयांची भरपाई विनायक इंटरप्रायझेसचे सहा भागीदार यांनी प्रत्येकी 3 कोटी 73 लाख 21,500 रुपये प्रमाणे द्यावी, असे आदेश दिले.

प्रथमवर्ग दंडाधिकारी चौगले यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे व्याजदर रक्कम दिल्यापासून निकालाच्या तारखेपर्यंत 100 महिन्यांचे व्याज लागू केले. व्याजाची रक्कम 9 कोटी 62 लाख 50 हजार 500 रुपये असल्याचे निकालात स्पष्ट केले. शिवाय विनायक इंटरप्राइझेसचे सहा भागीदार यांना एक वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली. तर, आरोपी क्रमांक 5 सुधाकर हळवे (75) यांच्या वयाचा विचार करून त्यांना एक वर्षाचा साधा कारावास, अशी सवलत दिली.