होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणचे १० भाविक चांदवडच्या अपघातात ठार

कल्याणचे १० भाविक चांदवडच्या अपघातात ठार

Published On: Jun 08 2018 12:50AM | Last Updated: Jun 08 2018 12:50AM   केडीएमसीच्या सफाई कामगार वसातहीवर शोककळा

कल्याण : वार्ताहर

श्री क्षेत्र उज्जैन (मध्यप्रदेश) येथून देवदर्शन करून परतत असताना झालेल्या भीषण अपघातात कल्याणमधील 10 जणांचा बळी गेला. गुरुवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड-सोग्रास (जि. नाशिक) फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. बिघाड झाल्याने रस्त्यातच उभा असलेल्या वाळूच्या ट्रकवर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर्स बस जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर चांदवड  उपजिल्हा रुग्णालयात चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सफाई कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. या घटनेमुळे कामगार वसाहतीत शोककळा पसरली आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालय भागातील सुभाष मैदानालगतच्या परिसरात असलेल्या अंबे निवास व इंदिरा निवास येथील रुखी समाज वसाहतीत पालिकेचे सफाई कर्मचारी राहतात. तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासनिमित्त हे सफाई कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक असे 20 ते 25 भाविक उल्हासनगरच्या साई ट्रॅव्हल्सची मिनी बसने (एमएच 05 सीके 357) सोमवारी (दि. 4 जून) श्रीक्षेत्र उज्जैन येथे गेले होते. तेथून दर्शन घेऊन हे सर्व भाविक परतात असताना गुरुवारी पहाटे चांदवडजवळ टेम्पो ट्रॅव्हलर्सचा अचानक टायर फुटला. यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून ही बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हल्सचा पुढील भागाच चेंदामेंदा झाला. अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू तर, चौघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी नऊ जण नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे तर चार जणांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सफाई कामगारांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत अपघातात मरण पावलेल्यांचे मृतदेह कल्याणमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार असल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने सफाई कामगारांमध्ये शोककळा पसरली असून महापालिका वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.