Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेला विरोध करणे उचित नाही’

‘मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेला विरोध करणे उचित नाही’

Published On: Jul 22 2018 10:31AM | Last Updated: Jul 22 2018 10:31AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे. उर्वरित  मागण्यांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व जण प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे, उचित ठरणार नाही. यासाठी विरोध न करता चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

ना. पाटील म्हणाले, मराठा समाजाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सगळ्या जगाला आदर्श होईल, अशा पद्धतीने हे मोर्चे काढून त्यांनी सरकारसमोर मागण्या ठेवल्या. या मागण्यांचा विचार करत सरकारने वेळोवेळी निर्णय घेत या मागण्या मान्य केल्या. शिष्यवृत्तीमधील सवलत, वसतिगृहांमधील सवलत, नोकर्‍यांमध्ये तसेच शिक्षणात आरक्षण यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. न्यायालयातही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे. न्यायालयातील बाबीतदेखील सरकारची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगण्याचे काम केले जात आहे.

नुकतेच विधानसभेत मुख्यमंत्री फडवणीस यांनी नोकरभरतीतही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. यावरूनच  सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असल्याचे दिसून येते. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपसमितीची नेमणूक करण्यात आली असून, स्वत: मी अध्यक्ष या नात्याने कामकाज जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच अण्णासाहेब  पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास योजनादेखील मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी लागू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मागण्या पूर्ण होत असताना पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. आपल्या अजूनही काही मागण्या असल्यास त्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे व त्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करील. त्यामुळे विरोध करण्यापेक्षा चर्चा करून मार्ग निघू शकतो, असेही ना. पाटील म्हणाले.