Thu, Jul 18, 2019 13:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तक्रारीला विलंब म्हणजे पीडिता खोटे बोलते असे नाही

तक्रारीला विलंब म्हणजे पीडिता खोटे बोलते असे नाही

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

बलात्काराची तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबासारख्या किरकोळ विसंगती या पीडितेची बाजू कमकुवत करू शकत नाहीत़  पीडित महिलेने घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी तक्रार केली म्हणजे ती खोटे बोलते असे नाही, असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. भारतीय महिला ही अशा प्रकारचा खोटा आरोप दुर्मीळरीत्या करतात, असे निरीक्षणही न्यायमूर्ती ए़  एम़  बदर यांनी करून सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चौघांच्या शिक्षेवर शिक्‍कामोर्तब करताना आरोपींचे अपील फेटाळून लावले.

सामूहिक बलात्कारप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून ठोठावलेल्या 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेविरोधात दत्तात्रय कोरडे, गणेश परदेशी, पिंटू खोस्कर आणि गणेश झोळे या चौघा आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपिलावर न्यायमूर्ती ए़  एम़  बदर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वतीने युक्‍तिवाद करताना, पीडित महिला व तिच्या मित्राचे अश्‍लील वर्तन पाहिले होते़  त्यामुळेच आपल्याविरोधात सामूहिक बलात्काराचा खोटा आरोप लावण्यात आला, असा दावा करण्यात आला. खोटे बोलत असल्यानेच तक्रार करण्यास विलंब झाला. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना पीडित मुलीच्या शरीरावर कसलीही दुखापत आढळून न आल्याने वैद्यकीय अहवालातही बलात्काराची शक्यता फेटाळून लावण्यात आली होती, असा दावा केला. मात्र, आरोपींचे सर्व दावे न्यायालयाने फेटाळून लावत जिल्हा न्यायालयाने ठोठावलेल्या 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर शिक्‍कामोर्तब करून आरोपीचे अपील फेटाळून लावले.