Tue, Nov 20, 2018 01:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : पोलिस ठाण्यासमोरच महिलेची लूट

डोंबिवली : पोलिस ठाण्यासमोरच महिलेची लूट

Published On: Mar 08 2018 9:06PM | Last Updated: Mar 08 2018 9:06PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीत धूम स्टाईलने पादचारी महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा चक्रावली असतानाच थेट कोळसेवाडी पोलिस ठाण्यासमोरून चालत जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचून लुटारूंनी पळ काढल्याची घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याण पूर्वेत घडली आहे. चक्क पोलिस ठाण्यासमोर महिलेला लुटल्याच्या घटनेमुळे लुटारूंना पोलिसांची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. 

कल्याण पुर्वेकडे विठ्ठलवाडी-खडेगोळवली परिसरात गोकुळ कॉलनी चाळीत राहणाऱ्या लता कदम (47) ही महिला बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या गेट समोरील भाजी मार्केट येथून जात होती. इतक्यात समोरून विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकी आली. या दुचाकीवर बसलेल्या दोघांनी या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगसळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी कदम यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.