Thu, May 28, 2020 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आम्ही आवाज उठवतच राहू,' कलाकारांचा ठाम पवित्रा

'आम्ही आवाज उठवतच राहू,' कलाकारांचा ठाम पवित्रा

Last Updated: Oct 10 2019 1:40AM

पंतप्रधानांना पत्र लिहिणे हा देशद्रोह कसा काय होऊ शकतो? : कलाकारांचा सवाल मॉब लिंचिंगवर मोदींना पत्र लिहिणाऱ्या ४९ जणांवर एफआयआर, कलाकारांचा निषेध 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मॉब लिंचिंगविरोधात बॉलिवूड आणि इतर इंडस्ट्रीतील स्टार्सनी पीएम मोदी यांना खुले पत्र लिहिले होते. त्यानंतर ४९ सेलिब्रिटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा, मणि रत्नम, अनुराग कश्यप आणि अपर्णा सेन यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या दिग्गजांनी मॉब लिंचिंगवर चिंता व्यक्त करत मोदी यांना खुले पत्र लिहिले होते.

खुले पत्र लिहिणाऱ्या ४९ लेखक-कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याचा तीव्र निषेध कलाकारांनी केला. पंतप्रधानांना खुले पत्र लिहिणे ही देशद्रोही कृती कशी काय होऊ शकते, असा सवाल करत आम्ही आवाज उठवतच राहू, आम्ही बोलत राहू, असा पवित्रा या लेखक-कलाकारांनी घेतला. अभिनेते नसिरुद्दिन शहा, सिनेमॅटोग्राफर आनंद प्रधान, इतिहासकार रोमिला थापर, कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्यासह १८५ हून अधिक कलाकारांनी हा पवित्रा घेतला आहे.

देशातील विविध ठिकाणी मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करणारे खुले पत्र कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्याबद्दल दिग्दर्शक अपर्णा सेन, अदूर गोपालकृष्णन, लेखक रामचंद्र गुहा, दिग्दर्शक मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, शुभा मुद्गल आदी ४९ कलाकारांवर ३ ऑक्टोबर रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर अनेक कलाकारांनी एकत्र येत ७ ऑक्टोबर रोजी नवे पत्र लिहून या एफआयआरवर प्रश्न उपस्थित केला. सांस्कृतिक क्षेत्रातील ४९ सहकाऱ्यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे खुले पत्र पंतप्रधानांना लिहिले. हा देशद्रोह कसा काय होऊ शकतो? की लोकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी न्यायालयांचा गैरवापर करून केलेला हा छळ आहे?,' असा सवाल या पत्रात करण्यात आला आहे.

या पत्रावर लेखक अशोक वायपेयी, जेरी पिंटो, शिक्षण तज्ज्ञ इरा भास्कर, संगीतकार टी. एम. कृष्णा, कवी जीत थायील, लेखक शमसुल इस्लाम आणि चित्रपट निर्माते-कार्यकर्ते साबा दिवान यांच्या सह्या आहेत.

मॉब लिंचिंगवर मोदींना पत्र लिहिणाऱ्या ४९ जणांवर एफआयआर 

४९ सेलेब्रिटीजवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. वकील सुधीर कुमार ओझा यांनी आपल्या याचिकेत ४९ सेलेब्रिटीजवर आरोप केला होता की, 'सदर सेलेब्रिटींनी देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्र लिहिणाऱ्यांनी फुटीरतावादी प्रवृत्तींचे समर्थनही केलं आहे.'

यावर स्थानिक वकील सुधीर कुमार ओझाने दोन महिन्याआधी  याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत  मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सर्व ४९ सेलेब्रिटीजवर एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. 

कलाकारांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटले होते?

''देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आम्ही सर्व जण, सद्सद्विवेकबुद्धी असलेले नागरिक म्हणून या छळवणुकीचा निषेध करतो. आमच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातील प्रत्येक शब्दाला आमचा पाठिंबा आहे. म्हणून आम्ही ते पत्र पुन्हा एकदा जाहीर करत, हाच मार्ग अनुसरण्याचे आवाहन कला, शिक्षण आणि कायद्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना करतो. आमच्यातील अधिकाधिक लोक रोज आवाज उठवतील. झुंडशाहीच्या विरोधात, लोकांचा आवाज दाबून टाकण्याविरोधात, लोकांना छळण्यासाठी न्यायालयांचा गैरवापर करण्याच्या विरोधात बोलत राहतील.'' असा मजकूर कलाकारांच्या पत्रात आहे.