Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शूटरला अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शूटरला अटक

Published On: Aug 18 2018 9:51PM | Last Updated: Aug 18 2018 11:23PMमुंबई : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट तब्बल पाच वर्षांनंतर उघडकीस आणण्यात राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर यश आले. घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना एटीएसने अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिली. या तिघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून एटीएसने औरंगाबादमधील सचिन प्रकाशराव अणदुरे याला शनिवारी ताब्यात घेऊन सीबीआयच्या हवाली केले. अणदुरेनेच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आल्याचे कळते.    

डॉ. दाभोलकर यांच्यापाठोपाठ गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी अशा ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्याकांडांनी राज्यासह संपूर्ण देश हादरला होता. या हत्यांचा कट उघडकीस आणण्यास हतबल ठरलेल्या सीबीआयलाही उच्च न्यालयानेही वारंवार धारेवर धरत खडेबोल सुनावले होते. अखेर डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाल्याने पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही मारेकर्‍यांचा लवकरच शोध घेण्यात तपास यंत्रणांना येत्याकाळात यश येईल, अशी शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

एटीएसने नऊ ऑगस्टच्या रात्री आणि 10 ऑगस्टच्या सकाळी नालासोपारा, तसेच पुणे येथे छापे टाकून राऊत याच्यासह कळस्कर आणि गोंधळेकर यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांकडेही केलेल्या कसून चौकशीत यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याची आणि अणदुरे याच्या मदतीनेच ही हत्या घडवून आणल्याची धक्‍कादायक कबुली एटीएसला दिली. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या एका पथकाने औरंगाबाद येथून अणदुरेला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यानेही या हत्येची कबुली दिली. हा गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी असल्याने अणदुरेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे.

अणदुरेची चौकशी

दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयनेही, अणदुरेला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. अणदुरे याला रविवारी पुण्यातील सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी आणखी दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने या तिन्ही हत्याकांडाचे धागेदोरे उघडकीस आणण्यात एटीएसला पुरेसा अवधी मिळाला आहे.

पाच वर्षांनी उकल

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. दाभोलकर यांच्यावर पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर पुलावर अडवत मोटारसायकवरून आलेल्या दोघांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यात डॉ. दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी घडलेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. स्थानिक पोलिसांसह राज्यातील आणि केंद्रातील सर्व तपास यंत्रणा या हत्याकांडाची उकल करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, गेली पाच वर्षे कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते. अखेर शनिवारी या हत्याकांडाची उकल करण्यात एटीएसला यश आले.

आणखी एक ताब्यात

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने जालना येथील आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. 26 ते 30 वयोगटातील हा तरुण असून, अंबड चौफुलीच्या महसूल कॉलनीत तो राहतो. या तरुणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत सूत्रांनी तूर्त नाव जाहीर करण्यास नकार दिला. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबादेतून अटक करण्यात आलेल्या सचिन अणदुरेचा औरंगाबादच्या दंगलीतही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. दंगलीतील त्याच्या सहभागाची कुणकुण पोलिसांना लागली. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने सचिन पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दाभोलकर हत्त्या तपासात ‘पुढारी’चा ‘क्ल्यू’ निर्णायक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात पत्रकारितेच्या माध्यमातून ‘पुढारी’ने वेळोवेळी घेतलेली धाडसाची भूमिका व ‘क्ल्यू’ निर्णायक ठरला. हत्या झाल्यानंतर ‘पुढारी’ने वेळोवेळी या प्रकरणाचा छडा लागावा, यासाठी आवाज उठवला होता. ‘अंनिस’नेही व्यापक स्वरूपात आंदोलने केली. दहा दिवसांपूर्वी नालासोपारा व्हाया सातारा बॉम्ब स्फोटके कनेक्शन समोर आल्यानंतर सातारा ‘पुढारी’ला याबाबत महत्त्वाचा सुगावा लागला.    

नालासोपारा प्रकरणात साताराचा सुधन्वा गोंधळेकर याचा समावेश असल्याने ‘पुढारी’ ऑनलाईनच्या माध्यमातून डॉ. हमीद दाभोलकर यांची नुकतीच 13 ऑगस्ट रोजी मुलखात घेतली. डॉ. हमीद दाभोलकर यांनीही पुढारीकडे नालासोपारा कनेक्शनमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचाही तपास करा, अशी स्फोटक मागणी केली. या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलेले असताना एटीएस, सीबीआयने या वृत्ताची गंभीर दखल घेत अखेर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत  शनिवारी सचिन अंदूरे याचे नाव समोर आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ‘पुढारी’च्या रोखठोक भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
 

Image may contain: 1 person