मुंबई : प्रतिनिधी
पाच फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे पंधरा कोटी रुपयांचा अपहार करून एका 65 वर्षांच्या वयोवृद्ध प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार आणि फसवणूकप्रकरणी कारीगौसल वरा हसमतअली अन्सारी या अरबी शिक्षकाला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली.
या गुन्ह्यांत अटक झालेला कारीगौसल हा तिसरा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात तक्रारदार सिनेअभिनेत्रीचा कथित प्रियकर आणि पती मोहम्मद सर्फराज एहसान ऊर्फ अनुप खन्ना आणि त्याचा व्यावसायिक मित्र किशोर हेमंतदास नाथानी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर गौरीगौसलला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुहू येथे राहणारी ही अभिनेत्री 80 व 90 च्या दशकातील एक टॉप अभिनेत्री होती. सात वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते, लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्याने तिला पाच फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे पंधरा कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर निकाह केल्याचे बोगस दस्तावेज बनवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केला. मात्र काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीला मोहम्मद सर्फराजने तिची फसवणूक केल्याचे समजले होते. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांत लैंगिक अत्याचारासह फसवणुकीची तक्रार केली होती.
त्यानंतर मोहम्मद सर्फराजला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, एक पंधरा लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, 37 लाख रुपयांच्या तीन महागड्या गाड्या, काही बोगस दस्तावेज आणि विविध बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड, पासपोर्ट जप्त केले होते. पंधरा लाखांचा डिमांड ड्राफ्ट तयार करणार्या किशोरलाही अटक करण्यात आली आहे.