Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात

शस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:29AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशीक चांदवड टोलनाक्यावर मोठ्या शस्त्रसाठ्यासह तीघांना अटक केल्यानंतर तपास यंत्रणांनी शिवडी क्रॉस रोड परिसरातून आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका (27) याच्या विरोधात शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी वडाळा टी टी आणि रफीअहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते.

शिवडी क्रॉस रोड परिसरात राहात असलेला सुका याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे बोलले जाते. याच परिसरातील नॅशनल मार्केट परिसरात राहात असलेल्या उत्तर भारतीय गुन्हेगारांना एकत्रकरून त्याने शस्त्रास्त्रे लुटीचा प्लॅन आखला आणि साथिदार सलमान अमानुल्ला खान (19) व चालक साथिदार नागेश बनसोडे याच्या मदतीने तो प्लॅन यशश्‍वीसुद्धा केला. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तीन्ही आरोपींची गुन्हेगारी कारवायांची माहीती घेण्यास राज्य दहशतवादी विभाग (एटीएस) आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणानी सुरुवात केली आहे. तिन्ही आरोपींच्या घरी झडती घेतल्यानंतर एकाला शिवडीतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते.

शस्त्रास्त्रांसह जप्त करण्यात आलेली बोलेरो कार अंधेरीच्या आंबोली परिसरातून चोरी झाल्याची तक्रार फिरोज खान यांनी केली होती. ही कार फिरोजची आई गौसीया यांच्या नावावर असल्याची माहिती मिळते. ओशिवरा परिसरात राहात असलेल्या खान कुटूंबियांचे याच परिसरात गॅरेज आहे. कार चोरीची तक्रार घेऊन आलेल्या फिरोज याला पोलिसांनी परिसरात कारचा शोध घे आणि ती न सापडल्यास दोन दिवसांनी परत ये असे सांगितले होते. मात्र कामानिमित्त मुंबईबाहेर गेल्याने न परतल्याचे फिरोजने पोलिसांना सांगितले असून पोलिसांसह गुप्तचर तपास यंत्रणांनी त्याच्याकडेही कसून चौकशी सुरू केली आहे.