Sat, Mar 28, 2020 16:55



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा

क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा

Last Updated: Feb 24 2020 1:30AM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील चांगल्या प्रथा, परंपरा जोपासून राज्याला वैभवाचे दिवस आणण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम घ्यावेत. शासन खेळांना प्रोत्साहन देत आहे. यापुढेही देणार असून युवकांनी परिश्रम करून अधिकाधिक पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आणि खेलो इंडिया खेलो यूथ स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार समारंभात मुख्?यमंत्री बोलत होते. यावेळी पंढरीनाथ पठारे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गो गर्ल गो’ या योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. 

क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, आमदार राहुल नार्वेकर, चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, युवकांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मातीतील खेळांकडे वळले पाहिजे. स्वत:चे आरोग्य चांगले ठेवून आपल्या राज्याच्या कल्याणासाठी जे जे चांगले करता येईल ते केले पाहिजे, असे ते म्हणाले. क्रीडा पुरस्कार हे मिळत नाहीत तर कठोर परिश्रमाने कमवावे लागतात. राज्यातील खेळाडूंनी अटकेपार झेंडा फडकवून ‘खेलो इंडिया खेलो’ या स्पर्धेत राज्याला देशात अव्वल स्थान मिळवून दिले. यामुळे या खेळाडूंचा भव्यदिव्य गौरव करणे हे राज्याचे कर्तव्य होते. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात स्पर्धेसाठी ऊर्जा निर्माण केली जाते.  सध्या युवा पिढी सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम्?समध्?ये गुरफटत चालली आहे. यासाठी मैदानी खेळांना प्राध्यान्य देऊन राज्यातील युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

क्रीडामंत्री केदार यांनी प्रास्ताविक केले. खेळामुळे जातिभेद, लिंगभेद मिटून जातात. खेळ आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. अभ्यासातील एकाग्रता वाढवतात. यासाठी युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच खेळांतही प्रावीण्य मिळवावे. जगातील प्रत्येक विकसित देश हा क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करत आहे. आपणही त्यांचे अनुकरण करून प्रगती करूया, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार्थींना आणि खेलो इंडिया खेलो स्पर्धेतील खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी केले.

‘गो गर्ल गो’ योजनेचा शुभारंभ
राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे आयोजित ‘गो गर्ल गो’ या अभिनव योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींची शारीरिक तंदुरुस्त राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्यासाठी 1 कोटी 4 लाख मुलींना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन आयोजकांद्वारे करण्यात येणार आहे. मुलींना क्रीडासह सर्व क्षेत्रांत यशस्वितेसाठी ‘गो गर्ल गो’ योजना यशस्वी ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.