Fri, May 24, 2019 06:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या अपघातात ५ तरुण जागीच ठार

पालघरच्या अपघातात ५ तरुण जागीच ठार

Published On: Feb 07 2018 7:56AM | Last Updated: Feb 07 2018 10:16AMपालघर/ केळवे : वार्ताहर

पालघर-माहीम रस्त्यावर सर जे. पी. शाळेजवळ पाटीलवाडी येथे बुधवारी (काल) पहाटे तीनच्या सुमारास कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचही तरुण जागीच ठार झाले. 

हे तरूण एम.एच.48, ए-0696 या क्रमांकाच्या वोक्स वॅगन कारमधून मंगळवारी रात्री वडराई येथील मित्राचा हळदी समारंभाचा कार्यक्रम आटोपून माहीमवरून पालघरच्या दिशेने येत होते. पाटीलवाडी येथे चालक विराजचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी वडाच्या झाडावर आदळली. निकेश मोहन तामोरे (25 रा .तारापूर घिवली), किरण परशुराम  पागधरे (30,रा.वडराई), संतोष वामन बहिराम (37,रा. खाणपाडा), दीपेश रघुनाथ पागधरे (25, रा. सातपाटी), विराज अर्जुन वेताळ (25, गाडी चालक-मालक, रा. पालघर) यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व तरूण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. भल्या पहाटेची वेळ असल्याने अपघातग्रस्तांना कोणाचीही मदत मिळाली नाही. अपघातग्रस्त गाडीतून बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

विक्रमगड : विक्रमगड-वाडा रोडवर भावरपाडा येथे बुधवारी झालेल्या भीषण अपघातात कृष्णा धोडी आणि प्रवीण राजू सवर या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा धोडी आणि प्रवीण राजू सवर हे दोघेएमएच 48, झेड 4332 या मोटारसायकलने घरी जात असताना विक्रमगड-पाली रोडवर त्यांच्या मोटारसायकलला ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातानंतर पळून जाणार्‍या ट्रकचालकाला पाली येथे पकडण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवर कोण घालणार?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी अवजड वाहतूक करणार्‍या गाड्यांचे चालक कासा-विक्रमगड-पाली मार्गे भिवंडी रस्त्याच्या वापर करतात. हा रस्ता अरूंद असल्यामुळे वारंवार असे अपघात घडत आहेत. पोलिसांनी कासा-विक्रमगड-पाली मार्गाचा वापर करणार्‍या  मालवाहतूकदारांवर कठोर कारवाई करून ही वाहतूक थांबवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.