Mon, Aug 26, 2019 08:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रचाराच्या तोफा आता मुंबई, ठाण्याकडे

प्रचाराच्या तोफा आता मुंबई, ठाण्याकडे

Published On: Apr 23 2019 1:35AM | Last Updated: Apr 23 2019 1:39AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीतील तिसर्‍या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत असून प्रचाराच्या तोफा आता 29 तारखेला होणार्‍या अंतिम टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराकडे वळणार आहेत. मुंबई, ठाण्यात संथ गतीने सुरु असलेला प्रचारही तापणार आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खारघर आणि मिरा-भाईंदर येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाचौकी येथे सभा घेणार आहेत.  

चौथ्या टप्प्यात सर्वाधिक 17 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मतदानाचे तीन टप्पे पार पडल्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराला रंग चढणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात विदर्भ, मराठवाड्यात चुरशीच्या लढती  झाल्या असून तिसर्‍या टप्प्यात अनेक मतदारसंघात तटातटीच्या लढती झाल्याने चौथा टप्प्यातील निवडणूकीत सर्वच पक्ष ताकद झोकून देण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे हा शिवसेना — भाजप युतीचा बालेकिल्ला असून तो राखण्यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 

मंगळवारी मुख्यमंत्री पनवेल बरोबरच मुंबईत परेल आणि अंधेरीत जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शरद पवार हे खारघर पार्थ पवार यांच्यासाठी तर मिरा — भाईंदरमध्ये आनंद परांजपे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ठाण्यात महापालिका मुख्यालयासमोर सभा होत आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत भांडूप आणि काळाचौकी येथे सभा जाहीर केल्या आहेत. त्यापैकी पहिली सभा मंगळवारी काळाचौकी येथे होत आहे.