Tue, Oct 24, 2017 16:56
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तारात सेनेपुढे नाराजांचा पेच!

मंत्रिमंडळ विस्तारात सेनेपुढे नाराजांचा पेच!

Published On: Aug 13 2017 2:08AM | Last Updated: Aug 13 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : उदय तानपाठक

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असून या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांच्या कामाचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असल्याचे समजते.

विधिमंडळ अधिवेशनात प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आणि या मंत्र्यांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना जाहीर करावे लागले. दिल्लीतून याबद्दल विचारणा झाली असून सगळ्याच मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा पाठवा, असे आदेश दिले गेले आहेत. ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना सरळ घरी पाठवून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल, तर अनेक मंत्र्यांची खाती बदलली जातील, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्यासह विरोधी तसेच मित्रपक्षातील काही आमदारही भाजपमध्ये येण्यासाठी तयार असून आता केवळ मुहूर्त काढणे बाकी आहे. प्रकाश मेहता यांना राजीनामा द्यायला न लावता त्यांचे खाते बदलले जाईल, अशी शक्यता आहे. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास कोणते खाते द्यायचे, यावर भाजपमध्ये खल सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम किंवा गृहनिर्माण यापैकी एक खाते राणे यांच्याकडे दिले जाईल, अशी चर्चा आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. मात्र, यावेळी त्यांना घेतले जाण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वारणा उद्योग समूह व जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे हे भाजपशी संपर्कात असून भाजपमध्ये सामील व्हायचे की युती करायची, यावर चर्चा सुरू आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. कोरे यांना विधान परिषदेवर घेतले जाईल. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. मुंबई महापालिकेतील भाजपला मिळालेल्या यशाची बक्षिसी शेलार यांना मिळण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांकडील एकापेक्षा अधिक असलेली खाती काढून ती नव्याने येणार्‍या मंत्र्यांकडे दिली जातील. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडील उत्पादन शुल्क खाते कायम ठेवून ऊर्जा खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. 

भाजपसोबतच शिवसेनेनेही आपल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला असून दोन मंत्र्यांना पक्षकार्यास जुंपून त्यांच्या जागेवर विधानसभेतले चेहरे देण्याचा विचार सुरू असला, तरी तसे केल्यास अन्य आमदारांची नाराजी उफाळून येईल, अशी भीती पक्षनेतृत्वाला वाटत असल्याने तीच स्थिती कायम ठेवली जाईल, असे दिसते. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात शिवसेनेच्या वाट्याचे राज्यमंत्रिपद दिले जाईल, अशी अपेक्षा असून तिथेही कुणाला मंत्री करायचे, याचा तिढा पडला आहे. एकाला मंत्रिपद दिले की अन्य नाराज होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.