Tue, Jul 07, 2020 20:03



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरचा सामना भाजप-सेनेतच!

पालघरचा सामना भाजप-सेनेतच!

Published On: May 15 2018 1:40AM | Last Updated: May 15 2018 1:39AM



मुंबई : प्रतिनिधी

केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये पालघरच्या पोटनिवडणुकीत सामना झडत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या  दिवशी शिवसेना-भाजपमधील ही लढत फायनल झाल्याचे स्पष्ट झाले.

पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्या ठिकाणी आपल्याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याचे सांगत दिवंगत खासदारांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपसाठी हा मोठा धक्‍का  होता.  सर्वसाधारणपणे दिवंगत लोकप्रतिनिधीच्या घरातच त्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाते; पण याबाबतचा निर्णय होण्यापूर्वीच श्रीनिवास वनगा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. श्रीनिवास वनगांच्या खेळीमुळे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना  काँग्रेसमधून आयात करून  त्यांना उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर आली.

श्रीनिवास वनगा यांचे आम्ही पुनर्वसन करू, त्यांची उमेदवारी मागे घ्या, असा प्र्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला. मात्र, पालघरच्या पोटनिवडणुकीपासूनच शिवसेना भाजपमधील सामन्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळून लावला.त्यामुळे आता या दोन पक्षांतील लढत फायनल झाली आहे.

काँग्रेसचे राजेंद्र गावित ऐनवेळी  भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसवरही उमेदवार शोधण्याची वेळ आली. अखेर दामू शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप, शिवसेना, काँग्रेससह सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, शिवसेनेने वनगांना  उमेदवारी देऊन चूक केल्याचे सांगणार्‍यांनी काँग्रेसमधून आयात केलेल्याला उमेदवारी देऊन पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.