Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरफोडीतील फटका गँग जेरबंद 

घरफोडीतील फटका गँग जेरबंद 

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMधारावी : प्रतिनिधी 

माहीम ते वांद्रे रेल्वे परिसरात धुमाकूळ घालणार्‍या फटका गँगला अटक करण्यात शाहूनगर पोलिसांना यश आले आहे. या गँगचा म्होरक्या रियाज इसरार शेख (22), वसीम उर्फ मोना अफझल अन्सारी (22) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना माहीम बंद फाटक येथील घरफोडी प्रकरणी, तर बाबू हाश्मी (23), टोनी छाब्रिया (32) यांना चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात माहीम बंद फाटक परिसरातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून या चोरट्यांनी घरातील 8 तोळे सोन्याचे दागिने लांबविले होते. तपास सुरु असताना रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अल्पवयीन चोरटा दिसून आला. लागलीच पोलिसांनी वांद्रे येथून एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, टोळीचा म्होरक्या रियाज शेख सापडला. पोलिसांचे अटकसत्र सुरु केल्याने चोरटे गायब झाले. तपासाची सूत्रे हाती येताच शाहूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम डिगे यांनी तात्काळ विशेष सूत्रांना घटनेबाबत कळविले. 

विशेष सूत्रांनी सदरील चोरटे बांद्रा रेल्वे कॉलनी पुलाजवळ गुरुवारी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तुकाराम डिगे यांना दिली. त्यानंतर डिगे यांनी पोलीस हवालदार प्रकाश भोसले, पोलीस नाईक संजय भिल्लारे, सहदेव पडवळ, पोलीस शिपाई मोहसीन पठाण यांच्यासह बांद्रा रेल्वे कॉलनी पूलाजवळ सापळा लावून मोठ्या शिताफीने चोरट्यांना अटक केली.  प्राथमिक तपासात या चोरट्यांची फटका गँग असून त्यांच्यावर वांद्रे व निर्मल नगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना समजले. या चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.