Sun, Jul 21, 2019 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसह आज महाराष्ट्र बंद

मुंबईसह आज महाराष्ट्र बंद

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:58AMऔरंगाबाद/मुंबई : विशेष प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी नऊ ऑगस्ट रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचा निर्णय, मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या औरंगाबाद येथील बैठकीत घेण्यात आला. बैठकीला 32 जिल्ह्यांमधून समन्वयक उपस्थित होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून,  बंदमध्ये कोणतीही हिंसा करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. कोणतीही हिंसा न करता, शांततेत बंद पुकारण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, राजेंद्र दाते-पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र काळे, चंद्रकांत भराट यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले. 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजावर दाखल केलेेले सरसकट गुन्हे मागे घेतले नाही, तर 15 ऑगस्टपासून चूल बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

क्रांतिदिनी बंद होणार की नाही, याबाबत मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. काहींनी बैठक घेऊन बंद पुकारणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे औरंगाबाद येथे होणार्‍या क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक हॉटेल विंडसर कॅसल येथे पार पडली. यानंतर समन्वयकांनी पत्रकारांशी संवाद साधला. सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत हा बंद राहणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. 

आत्मबलिदान केलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख द्यावेत

मुख्यमंत्र्यांनी कोणताही शब्दच्छल न करता आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. तसेच आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी. 10 ऑगस्टपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास, 15 ऑगस्टपासून चूल बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी, बैठकीत सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या समन्वयकांनी मत व्यक्‍त करून सरकारच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्‍त केली.

या बंदमुळे पुणे, औरंगाबाद, अमरावतीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी बंदमध्ये झालेला हिंसाचार पहाता ठाणे आणि नवी मुंबईत बंद पाळण्यात येणार नाही. या बंद दरम्यान राज्यात विविध ठीकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलने, निदर्शने होणार असल्याने पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे, औरंगाबाद, अमरावती आदि ठीकाणी जिल्हाधिकार्‍यांनी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत. औरंगाबाद येथे 10 तारखेपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबईत 25 जुलै रोजी झालेल्या आंदोलनावेळी हिंसक वळण लागले होते. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री उडाली होती. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत बंद न पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद नसला तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला मार्केटमधील व्यापार्‍यांनी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातही बंद न पाळता ठीकठीकाणी या आंदोलनात प्राणाचे बलिदान देणार्‍या समाज बांधवांना श्रध्दांजली वहाण्यात येणार आहे. हा बंद कोणत्याही समाजाच्या अथवा जाती धर्माच्या विरोधात नाही तर समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे सर्व समाजाने या बंदला सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद येथे बंदबाबत घेण्यात आलेल्या मराठा मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीनंतर करण्यात आले. 

मुंबईबाबत संभ्रम 

मुंबईत मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बंद न पाळता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेउन जाहीर केला होता. मात्र, बुधवारी दुपारनंतर मुंबई बंदचे मेसेज व्हायरल झाले. तसेच काही समन्वयकांनी मुंबईत उत्फुर्त बंद पाळण्यात येईल, असेही जाहीर केले. त्यातच जिल्हाधिकार्‍यांनी मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर केली नसली तरी अनेक खाजगी संस्थांनी खबरदारी म्हणून आपल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे एसएमएसही पालकांना पाठविण्यात आले.

नाशिक बंद नाही

नाशिक : सकल मराठा समाज, नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असली तरी बंदमधून नाशिक वगळण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू राहणार असून, डोंगरे मैदानावर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पंचवटी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.