Tue, May 21, 2019 00:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिव्यात बुलेट ट्रेनचे स्टेशन

दिव्यात बुलेट ट्रेनचे स्टेशन

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:43AMठाणे : दिलीप शिंदे

मुंबई- अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन भिवंडीमार्गे ठाणे तालुक्यातील सात गावांमधून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) अशी धावणार असून, या मार्गावरून धावताना ती पालघर जिल्ह्यातील विरार, बोईसरप्रमाणे दिवानजीकच्या म्हातार्डी गावामध्येही थांबणार असल्याचे वृत्त आले आणि या गावाचे नाव ऐकून सारेच चकित झाले आहेत. 

म्हातार्डी गावात बुलेट ट्रेनचे स्टेशन प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यात मौजे डावले, पडले, देसाई व आगासन या चार गावांच्या जमिनींच्या संयुक्त मोजणीस मंगळवारपासून  सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे दिव्यासह ठाणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाच्या कामास ठाणे जिल्ह्यातून सुरूवात होत आहे. या हायस्पीड ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद हे  508 किलोमीटर लांबीचे अंतर अवघ्या दोन तासात कापले जाईल. अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि.  कंपनीने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यांच्या आराखड्यानुसार मुंबई-अहमदाबाद या दरम्यान सुमारे 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी पालघर जिल्ह्यात विरार आणि बोईसर ही दोन स्थानके आहेत. मात्र ही ट्रेन थेट बीकेसीला जाणार नसून तिला भिवंडी तालुक्यातील 13 गांवे आणि ठाण्यामधील सात गावांखालून नवी मुंबईला वळसा घेऊन पोहोचेल. हा सर्व मार्ग भुयारी असेल. त्याचवेळी भिवंडीत डेपो आणि ठाण्यातील म्हातार्डी गावात एक स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याअनुषंगाने भूसंपादनास सुरुवात झाल्याने दुर्लक्षित जगाच्या नकाशावर येणार्‍या दिवा परिसरासह ठाणे जिल्ह्यातील विकासाला अधिक गती मिळेल. 

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील 13 गावांमधील सुमारे 32 हेक्टर जमीन बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असून मार्चच्या अखेरपर्यंत संयुक्त मोजणीस सुरुवात होईल, असा आशावाद भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले. तर बुलेट ट्रेनच्या 20.7 किलोमीटर अंतरासाठी दिवा परिसरातील 7 गावांमधील 18 हेक्टर 96 गुंठे जमीन संपादित केली जाणार आहे. 

त्यात सरकारी जमिनीचाही समावेश आहे. या गावांपैकी मौजे डावले, पडले, देसाई व आगासन या चार गावांच्या बाधित जमिनीची संयुक्त मोजणी 6 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचे शुल्क नॅशनल हायस्पीड रेल कॉ. या कंपनीने  भूमी अभिलेख विभागाकडे भरले आहेत. महिनाअखेरपर्यंत मोजणी पूर्ण करून एप्रिलमध्ये बाधित क्षेत्र आणि लाभार्थी निश्‍चित करून त्यांच्याशी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जमीन खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

या बाधित शेतकर्‍यांना, जमीन मालकांना समृद्धी महामार्गातील शेतकर्‍यांप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. या अनुषंगाने सोमवारी ठाण्याचे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन संयुक्त मोजणीबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.