होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकच जिद्द, बुलेट ट्रेन रद्द; पालघरमध्ये सेनेचा नारा

एकच जिद्द, बुलेट ट्रेन रद्द; पालघरमध्ये सेनेचा नारा

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:31AMकेळवे : वार्ताहर

स्थानिक भूमिपुत्रांना ज्या प्रकल्पांचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. केवळ गुजरातला मुंबईशी जोडून मुंबईची बाजारपेठ गुजरातला नेण्याचा जणू पंतप्रधानांनी विडा उचलला आहे. त्यामुळेच येथील शेतकर्‍यांचा काहीही विचार न करता हे प्रकल्प आपल्या माथी मारले जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा हा मनसुबा उधळून लावण्यासाठी शिवसेनेचा ‘एकच जिद्द, बुलेट ट्रेन रद्द’ हाच नारा राहील, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेत विराथन खुर्द येथे शनिवारी संध्याकाळी बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेची सभा झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, केवळ हिरे, मोती व्यापार्‍यांसाठी हे प्रकल्प हाती घेण्याचे सरकारने ठरवले आहे. याबाबत लोकसभेत आवाज उठवला जाईल. हे प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना नको असल्याने शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्‍वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले. प्रवक्त्या आ.नीलम गोर्‍हे यांनी शिवसेना कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहते, त्याप्रमाणे आताही उभी राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत मोजायला आम्ही तयार आहोत असे वक्तव्य केले.

यावेळी  जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, अमित घोडा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उदय बंधू पाटील, श्रीनिवास वनगा, केतन काका पाटील यांसह सफ ाळे येथील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.