Tue, Mar 19, 2019 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, इमारतीच्या पिलरला गेला तडा

इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, इमारतीच्या पिलरला गेला तडा

Published On: Apr 09 2018 10:08PM | Last Updated: Apr 09 2018 10:08PMकल्याणः वार्ताहर 

डोंबिवली पूर्वेकडील सुनीलनगर मधील डी.एन.सी. रोडवरील म्हात्रे कंपाउंड जवळील ओम शिव गणेश इमारतीचे गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीचे काम सुरु आहे. सोमवारी दुपारी अचानक या इमारतीच्या पिलरला तडे गेल्याने हादरा बसला. त्यामुळे रहिवाशी घाबरून इमारती खाली जमा झाले. या घटनेची माहिती समजताच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, स्थायीसमितीचे सभापती राहुल दामले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे इमारतीतील २२ कुटुंबीय बेघर झाली आहेत.

ओम शिव गणेश इमारतीला २५ वर्ष पूर्ण झाली असून या इमारतीती २२ कुटुंबीय राहतात. या इमारतीतील रहिवाश्यांनी प्रत्येकी ४० हजार भरून इमारत दुरुस्तीचे काम दिले होते. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झाल्याची माहिती येतील रहिवाशी कैलाश पवार यांनी दिली. पालिका अधिकारी आणि स्ट्रक्चरल ऑडीटर माधव चिकोटी, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी इमारतीची पाहणी केली. रहिवाश्यांची सुरक्षा महत्वाची असून त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. 

तर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी इमारतीचे दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने पिलरला तडा गेल्याचे सांगितले. उपअभियंता महेश गुप्ते यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व रहिवाशी इमारतीच्या बाहेर आले असून घरातील सामान बाहेर काढले नाही रहिवाश्यांना इमारती राहण्यास धोका असल्याने त्यांना काही दिवस नातेवाईकांच्या घरी राहण्यास जाण्याचा सल्ला दिला आहे.