Thu, Jan 17, 2019 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मीरा रोडमध्ये इमारतीला तडे : गृहसंकुलाला धोका

मीरा रोडमध्ये इमारतीला तडे : गृहसंकुलाला धोका

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:46AMठाणे : खास प्रतिनिधी

मीरा रोड येथील हाटकेश भागातील चार इमारतींच्या ग्रीनवुड गृहसंकुलातील स्टर्लिंग कोर्ट इमारतीला मंगळवारी मधोमध तडे गेले. इमारत कोसळण्याची भीती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत चारही इमारती रिक्त करून 82 कुटुंबीयांचे स्थलांतर केले आहे. या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून बेघर झालेल्या कुटुंबीयांना एमएमआरडीच्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करण्याचे आदेश मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी दिले आहेत. 

मीरा रोडच्या हाटकेश भागात 2002 मध्ये सात इमारतींचे  ग्रीनवूड गृहसंकुल उभारण्यात आले. त्यात एक सात मजली व अन्य चार मजली इमारती आहेत. या इमारती एकमेकांना लागून आहेत. त्यातील स्टर्लिंग कोर्ट इमारतीमधील माती पडत असल्याचा आवाज मंगळवारी संध्याकाळी रहिवाशांना आला आणि त्यांनी तातडीने  अग्निशमन दल आणि पोलिसांनी कळविले. अग्निशमन दल आणि पालिका अधिकार्‍यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या मधोमध गेलेला तडा पाहून प्रशासनाने तातडीने या गृहसंकुलातील चारही इमारती रिक्त करण्याचा निर्णय घेतला. 

या इमारतींमधील 82 कुटुंबियांना सामान घरातच सोडून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संकुलाला लागूनच लोढा ग्रुपमार्फत होणार्‍या बांधकामाच्या पायलिंगचे काम सुरू असल्याने ग्रीन वूड संकुलाला हादरे बसत आहेत आणि त्यातून इमारतीला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार सोसायटीने तीन महिन्यांपूर्वी आयुक्त मीरा भाईंदर महापालिका, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमीरा पोलीस ठाणे यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीकडे कुणीच लक्ष दिले नाही.

पुन्हा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी महापौर डिंपल मेहता तसेच आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र अपेक्षित दखल घेण्यात न आल्याने आमच्यावर ही वेळ आली, असा आरोप बेघर झालेल्या रहिवाशांकडून केला जात आहे.  दरम्यान महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रहिवाशांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पोलिसांनी घटनास्थळी दंगल विरोधी पथक तैनात केले आहे. अग्निशमन दलाचे जवान सुद्धा मंगळवारी रात्रीपासूनच लक्ष ठेवून आहेत.