Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डरने घर न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

बिल्डरने घर न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:39AMकल्याण : वार्ताहर

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज समोरील म्हाडा कॉलनीची जुनी इमारत बिल्डरने पुनर्विकासासाठी घेतली होती. बिल्डरने इमारतीचे काम पूर्ण तर केले नाहीच, शिवाय इमारतीमधील भाडेकरूंना भाडेही दिले नाही. त्यामुळे भाडेकरू श्याम लाडे हे त्रस्त होते.आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या यातही त्यांची फसवणूक झाली. या नैराश्येतून श्याम यांनी बुधवारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट तयार केली. ही नोट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे सदर बिल्डर वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

श्याम हे कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरातील म्हाडा कॉलनीत राहत होते. आठ वर्षापूर्वी पटेल बिल्डरने म्हाडा कॉलनीची इमारत पुनर्विकासाकरीता घेतली होती. दोन वर्षात काम पूर्ण करतो, असे आश्वासन करार करताना कॉलनीतील रहिवाशांना या बिल्डरने दिले होते. गेल्या आठ वर्षापासून रहिवासी नव्या घराच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच दोन वर्षापासून रहिवाशांना भाडे देणेही बिल्डरने बंद केले. या प्रकारामुळे लाडे त्रस्त झाले होते. त्यातून काही मार्ग काढण्यासाठी त्यांनी पतंजलीच्या पॅकेज वॉटरची एजन्सी घेण्यासाठी खटपट सुरू केली. त्यातही त्यांच्या सहयोगीने त्यांची फसवणूक केली. 

घर आठ वर्षापासून मिळत नाही. बिल्डरने दोन वर्षांपासून भाडेही देणे बंद केले. त्या पश्चात त्यांची व्यवसायात फसवणूक झाली. या सगळ्यामुळे लाडे यांना मानसिक ताण वाढला. त्यांनी बुधवारी विविध आजाराच्या गोळ्या एकाच वेळी खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नातून ते बचावले आहे. लाडे यांनी सुसाईड नोट लिहिली. ही नोट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे हा बिल्डर वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. 

याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या आधीही संबंधित बिल्डर याच वसाहतीमधील रहिवाशांनी केलेल्या आरोपमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडला होता.