Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची आत्महत्या

सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची आत्महत्या

Published On: Feb 28 2018 12:07PM | Last Updated: Feb 28 2018 12:06PMमुंबई : पुढारी ऑलाईन

विदर्भातील गोसेखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक जीगर प्रवीण ठक्कर (वय, ४१) याने आत्महत्या केली आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे गाडीमध्ये गोळी झाडून घेत त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मंगळवारी सायंकाळी ठक्कर काही कामानिमित्त नरिमन पॉइंट येथे आला होता. ६.३० वाजताच्या सुमारास त्याने चालक सुनील सिंग याला गाडी रस्त्याशेजारी पार्क करून गाडीबाहेर पाठवले व तो स्वत: आत थांबला. काही वेळातच त्याने रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली.  गोळीचा आवाज ऐकून सिंग याने गाडीचे दार उघडले. त्‍यावेळी जीगर रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. सिंगने पोलिसांना घटनेची माहिती कळवली. जी. टी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

गोसेखुर्दच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील शाखा कालव्याच्या शेवटच्या भागाचे मातीकाम आणि बांधकाम याचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला देण्यात आले होते. 56 कोटी रुपये किंमतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये दोन्ही कंपन्यांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन हे कंत्राट मिळवल्याचं एसीबीने केलेल्या तपासात समोर आला होतं.  त्‍यानंतर एसीबीने तत्कालीन अधिकार्‍यांसह संचालक कालिंदी शाह, तेजस्विनी शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जीगर ठक्कर, अरुणकुमार गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.