Fri, Apr 26, 2019 18:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्रिटिशकालीन हिल स्टेशनला झोपड्यांचा विळखा

ब्रिटिशकालीन हिल स्टेशनला झोपड्यांचा विळखा

Published On: Jul 08 2018 2:05PM | Last Updated: Jul 08 2018 2:05PMठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वे मार्गावर ब्रिटिश काळात रेल्वे गाडी धावण्याकरिता डोंगराला पोखरून बोगदा तयार करण्यात आला. या बोगद्याला पारसिक बोगदा म्हणून ओळखला जातो. धीम्या मार्गावर एक आणि जलद मार्गावर एक असे बोगदे ब्रिटिश काळात तयार करण्यात आले आहेत. हे शंभर वर्षे जुने बोगदे झाले असून जलद गती मार्गावरील ह्या बोगद्यावर अजूनही अनधिकृत बांधकामे आहेत. यामुळे बोगदा कमजोर झाला असून बोगद्याची दुरावस्था झाली आहे. हा बोगदा कधी कोसळला तर मध्य रेल्वे ठप्प होऊ शकते आणि लोकलवर्ती बोगद्याचे बांधकाम कोसळले तर मोठी जीवित हानी होऊ शकते.

बोगद्याची डागडुजी करण्याचे प्रयत्न रेल्वे लवकरच सुरू करणार आहे. पण ह्या पावसाळ्यात ह्या बोगद्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. धीम्या गती मार्गावरील पारसिक बोगद्याच्या डोंगरावर झोपडपट्टी दादांनी अतिशय कवडी मोल भाव देत पत्र्याच्या अनधिकृत झोपड्यांना विकल्या आहेत. ही डोंगर परिसराची हद्द वनविभागाकडे असून वनविभागाने संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळेच झोपड्या वाढल्या आहेत.

पुर्वी पारसिक डोंगर परिसरामध्ये ब्रिटिश काळात हिल स्टेशन असल्याचे रेल्वे प्रवाशी संघटना सांगतात. पण आता डोंगर परिसरावर झोपड्या होऊ लागल्या आणि ह्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले यामुळ हिल स्टेशन झोपड्यांच्या विळख्यात सापडले आहे. डोंगरावर घोळाई देवीचे मंदिर आहे. ब्रिटीश काळात हा डोंगर परिसर इंग्रजांचे पर्यटन क्षेत्र होते असे नागरिक सांगतात. परंतु डोंगरावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी झोपड्या बांधल्याने डोंगरावरील निसर्ग धोक्यात आला आहे.

पावसाळयात हा निसर्गरम्य पारसिक डोंगरचा परिसर पाहून लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना कोकणात आल्यासारखे जाणवते. डोंगरावर वाढत्या झोपड्या बघून पारसिक बोगद्यातून प्रवास करताना भीती देखील वाटत आहे. यामुळे ह्या पारसिक बोगद्याचे संकट कधी दूर होईल असा प्रश्न प्रवाशांना वारंवार सतावत आहे.