Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपर स्थानकाजवळील पूल जीर्ण 

घाटकोपर स्थानकाजवळील पूल जीर्ण 

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 1:19AMघाटकोपर : वार्ताहर

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पूल कोसळल्यानंतर रेल्वे रुळावरून जाणार्‍या पुलांची सध्या पाहणी सुरू आहे.  यामध्ये शनिवारी रेल्वेच्या अधिकार्‍यांना घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर असलेला पूल खालच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री पासून हा पूल पूर्णतः बंद करण्यात आला होता. दुरुस्तीनंतर रविवारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

पहाटेपासूनच घाटकोपर वर्सोवा लिंक रोडवरून पूर्व द्रुतगती मार्गावर येणारी वाहतूक या ठिकाणावरून बंद करून लालबहादूर शास्त्री मार्गावरून राजावाडी रुग्णालयाकडे जाणार्‍या पुलावरून तर दुसरीकडे गांधीनगर सिग्नलवरून वळवण्यात आली. यामुळे एकच गडबड उडाली होती. शनिवारी रात्री रेल्वेच्या अधिकार्‍यांना पुलाच्या खांबांना काही ठिकाणी तडे गेल्याचे तसेच पाणी खाली रेल्वे रुळावर कोसळत असल्याचे दिसले. पुलावरील पदपथ पूर्णतः जीर्ण झाले असून याच ठिकाणावरून पाणी पुलाखाली जात आहे. 

पदपथावर पेव्हर ब्लॉक, केबल, जलवाहिन्यांचा भार असल्याने येथील दुरुस्तीची गरज आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने पालिका एन विभागाला माहिती देताच पालिकेने वाहतूक पोलिसांना पुलावरील  वाहतूक बंद करण्याची विनंती केली. सकाळी कोणतीही पूर्वसूचना नसताना श्रेयस सिग्नल ते मराठी विद्यालय पंतनगरपर्यंत पूर्णतः रस्ता बंद करण्यात आला. यामुळे घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे  तसेच घाटकोपरवरून पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली. खासदार किरीट सोमय्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेमधील गटनेत्या राखी जाधव यांच्यासह पालिका-रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, वाहतूक अधिकार्‍यांनी रविवारी पुन्हा पुलाची पाहणी केली. सोमय्यांनी पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासनावर यावेळी टीका केली. दुपारी एक वाजताच्या दरम्यान पदपथ दुरुस्तीचे काम सुरु करून हा रस्ता देखील पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. पूल दुुरुस्त करुन रुंद करण्यात यावा, अशी मागणी यावेळी उपस्थित प्रवाशांनी केली. 

वांद्रे-माहीम वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश!

मुंबई : प्रतिनिधी 

अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून, मोडकळीला आलेला वांद्रे आणि माहीमदरम्यानचा वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. 3 जुलै रोजी अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये पाच जण जखमी झाले होते. तसेच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. तर या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.  

गेल्यावर्षी परळ- एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. यानंतर या ठिकाणी लष्कराच्या मदतीने पूल उभारण्यात आले. तर परळ येथे नवीन प्लॅटफॉर्म बांधला. या ठिकाणचा अरुंद पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे अंधेरी दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांची पाहणी करण्यात येणार आहे.