Sat, Jun 06, 2020 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : ९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक(Video)

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : ९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक(Video)

Published On: Jul 03 2018 8:22AM | Last Updated: Jul 03 2018 1:09PMमुंबई  : पुढारी ऑनलाईन

अंधेरी रेल्‍वे स्‍थानकाजवळ गोखले पूल कोसळल्याचे दुर्घटना आज (३ जून) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. यामध्ये आतापर्यंत ९ जखमींना बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कूपर रुग्‍णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी यातच अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यावेळी अंधेरी स्‍थानकाकडे लोकल येत होती परंतु मोटरमनच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळला. पूल ओव्‍हरहेड वायरवर पडला तसेच पुलाखालील पत्राशेडही या दुर्घटनेत कोसळले. त्यानंतर तासाभरातच पुलाचा उर्वरित भागही कोसळला. 

तत्‍पूर्वी, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्‍निशामकच्या चार गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या. तसेच पोलिस आणि रेल्‍वे प्रशासनाचे कर्मचारीही घटनास्‍थळी दाखल झाले. परिस्‍थितीचा आढावा घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. परंतु जोरदार पावसाने बचावकार्यात अडथळे येत होते. त्यानंतर त्या ठिकाणी श्वान पथक आणि एनडीआरएफचे जवानही दाखल झाले. दरम्यान, ढिगार्‍याखाली काहीजण अडकल्याची शक्यता असल्याने स्‍थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी युद्ध पातळीवर मलबा उचलण्याचे काम सुरू केले. 

सुरुवातीला जखमींचा निश्चित अंदाज नव्‍हता परंतु बचावकार्यात आतापर्यंत ९ जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. द्वारकाप्रसाद शर्मा (४७), गिंधानी सिंग (४०), मनोज मेहता (५२), हरीश कोहली (४५) अशी जखमींची नावे आहेत. पैकी एका अनोळखी ६० वर्षीय महिलेची आणि मनोज मेहता यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले शेकडोंचे प्राण

अपघातावेळी अंधेरी स्‍थानकाकडे लोकल येत होती. मुसळधार पावसामुळे लोकलचा वेग कमी होता. यावेळी पूल दुर्घटनेचा अंदाज आल्याने मोटरमनने वेळीच प्रसंगावधान राखत लोकल अंतर्‍यावरच थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व शेकडोंचे प्राण वाचले. 

पावसामुळे बचावकार्यात अडथळे

पूल दुर्घटनेस सोमवारपासून सातत्याने कोसळणारा पाऊस आहे, असे म्‍हटले जात आहे. त्यातच पूल जुना होता. या दुर्घटनेनंतर अर्ध्या तासात अग्‍निशामक, पोलिस आणि रेल्‍वेचे कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले. परंतु सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. 

लोकल वाहतूक ठप्‍प

गोखले पूल कोसळल्यानंतर पश्‍चिम रेल्‍वेची वाहतूक ठप्‍प झाली. त्यात पावसामुळेही लोकल वाहतूक उशीराच सुरू होती. रेल्‍वेने तात्‍काळ लोकांना हेल्‍पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले. अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्‍वेकडून हेल्‍पलाईन नंबर जारी. अंधेरीसाठी ०२२६७६३००५४, चर्चगेट ०२२६७६२२५४०, बोरवली ०२२६७६३४०५३ तसेच मुंबई मध्यसाठी ०२२६७६४४२५७ यावर संपर्क केला जाऊ शकतो

कूपर रुग्‍णालयात जखमींवर उपचार

दुर्घटनेतील जखमीना उपचारासाठी जवळच असणार्‍या कूपर रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. 

“आत्तापर्यंत नऊ जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे . दोन प्रवासी जबर जखमी असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे . या प्रवाशांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने पूर्ण तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल. कूपर रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना जखमींवर उपचारासाठी पाचारण करण्यात आले आहे."
-कपूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे

अपडेट :

अंधेरीतील पूल दुर्घटनेनंर एनडीआरएफच्या जवानांकडून मलबा हटवण्याचे काम सुरू, श्‍वानपथक घटनास्‍थळी दाखल. जखमींची संख्या ६ वर, बचावकार्य सुरू

द्वारकाप्रसाद शर्मा (४७), गिंधानी सिंग (४०), मनोज मेहता (५२), हरीश कोहली (४५), आणि एका अनोळखी महिलेचा जखमींमध्ये समावेश, जखमींना कूपर रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मनोज मेहता व अनोळखी महिला यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्‍वेकडून हेल्‍पलाईन नंबर जारी. अंधेरीसाठी ०२२६७६३००५४, चर्चगेट ०२२६७६२२५४०, बोरवली ०२२६७६३४०५३ तसेच मुंबई मध्यसाठी ०२२६७६४४२५७ यावर संपर्क केला जाऊ शकतो

सविस्‍तर वृत्त थोड्याच वेळात...