Tue, Jul 16, 2019 02:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेतील लाचखोर दुय्यम अभियंता गजाआड

मुंबई पालिकेतील लाचखोर दुय्यम अभियंता गजाआड

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के पश्‍चिम वार्डातील इमारत व बांधकाम विभागातील दुय्यम अभियंता किरण अशोक पाटील (38) याला 2 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ बेड्या ठोकल्या. एसीबीच्या या कारवाईमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदाराच्या मावसभावाने त्याच्या जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील राहत्या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम केले आहे. हे काम अनियमित असल्याने  पालिकेकडून त्याला नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे पालिकेच्या के पश्‍चिम वार्ड कार्यालयात गेले असता, येथील इमारत व बांधकाम विभागातील लाचखोर दुय्यम अभियंता पाटील याने नोटिसीप्रमाणे कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी केली. 2 लाख रुपयांचा पहिला हप्ता, त्यानंतर काही दिवसांनी आणखी 2 लाख रुपये आणि उरलेले 4 लाख रुपये नंतरच्या हप्त्यामध्ये द्या, असे पाटीलने तक्रारदार यांना सांगितले.

तक्रारदाराने 30 जुलैला लाचेची 2 लाख रुपयांची रक्कम त्याला दिली. त्यानंतर एसीबीकडे  पाटील विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेचा 2 लाख रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताना पाटीलला रंगेहाथ बेड्या ठोकल्या. पाटील याच्या कार्यालयासह घराची झडती सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकार्‍याने सांगितले.