Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोपरखैरणेच्या आंदोलनातील जखमी रोहन तोडकरचा मृत्यू

मराठा आरक्षणाचा तिसरा बळी, आंदोलनातील जखमी तरुणाचा मृत्यू

Published On: Jul 27 2018 12:09PM | Last Updated: Jul 28 2018 1:35AMनवी मुंबई : प्रतिनिधी

कोपरखैरणेतील मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणात कोपरखैरणे येथे राहणार्‍या रोहन दिलीप तोडकर (वय 25) हा तरुण जखमी झाला. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तो सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील चाफळ विभागात असलेल्या खोणवली गावाचा मूळ रहिवाशी आहे. रोहन हा जिओ मोबाईल टॉवर कंपनीत कामाला होता.

शुक्रवारी पहाटे त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयातून मूळगावी घेऊन जात असताना कोपरखैरणेत तणावाची परिस्थिती होती. वाशी हायवेवर 150 ते 200 तरुणांच्या जमावाने रुग्णवाहिका रोखली. यावेळी पोलिसांनी रोहनच्या नातेवाईकांना वाशी हायवेवरच शेवटचे दर्शन घ्या, म्हणून विनंती केली.  रोहनच्या मृत्यूनंतर कोपरखैरणे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रोहनच्या मृत्यूच्या बातमीने पुन्हा एकदा कोपरखैरणेत वातावरण तापण्याची दाट शक्यता व्यक्‍त केली जाते आहे. सकाळी काही भागातील दुकाने, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.  ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी मराठा  आंदोलनाला कोपरखैरणे येथून सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला 11 नंतर अचानक हिंसक वळण लागले. वाहनांची तोडफोड, वाहने जाळणे आणि दगडफेक सुरू होती. रात्री सात ते आठ वाजेपर्यंत ही धुमश्‍चक्री सुरूच होती. त्यावेळी कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड होत असताना एका जमावाने पाठलाग केला. त्यावेळी त्या जमावाच्या हाती रोहन तोडकर सापडला आणि त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. ही माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, ही माहिती कोणालाही कळू नये, याची खबरदारी सर्वांनी घेतली होती.

पोलिसांनी फोन करून महेंद्र नावाच्या एका रुग्णवाहिका चालकाला बोलवून तोडकरला महापालिका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणल्यानंतर तोडकर बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या डोक्याला, हातापायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून प्राथमिक उपचार करून महापालिका रुग्णालय प्रशासनाने त्याला जे. जे. रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती महापालिका वाशी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रशांत जवादे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

याबाबत माथाडी नेते व आ. नरेंद्र पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोपरखैरणे सेक्टर 15 येेथे मामा माथाडी कामगार (कांदा-बटाटा मार्केट) संदीप शिंदे यांच्याकडे रोहन तोडकर हा 25 वर्षीय तरुण राहत होता. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील खोणवली गावातील होता. शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या माहितीत, रोहन मराठा आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या व्यक्‍तींविरोधात आयपीसी 302 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.