Mon, Jul 22, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलगा मौलवी झाल्याने दाऊदला नैराश्य

मुलगा मौलवी झाल्याने दाऊदला नैराश्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : वृत्तसंस्था

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरला नैराश्याचा मोठा झटका आला आहे. दाऊदच्या नैराश्यामागे त्याच्या मुलाने मौलवी होण्याचा घेतलेला निर्णय हे कारण आहे. सध्या ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असेलला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने हा गौप्यस्फोट केला आहे.

मोईन कासकर हा दाऊदचा सर्वात लाडका मुलगा; पण मोईनने आता बापाच्या श्रीमंती जगण्याचा त्याग करून मौलवी बनण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या काळ्या व्यवसायामुळे कुटुंबाची जगभर नालस्ती होत असल्याने मोईनने काळ्या धंद्याच्या जगाची सूत्रे स्वीकारण्याऐवजी मौलवी बनण्याचा निर्णय घेतल्याचे दाऊदचा भाऊ इक्बालने आता उघड केले आहे. 

इक्बालने दिलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट होते की, दाऊदच्या साम्राज्याला त्याच्या रक्‍ताचा कुणीही वारस नाही आणि त्यामुळेच आधीच वार्धक्य आणि आजाराने खंगलेला दाऊद आणखीच खचला आहे. 

दाऊदचा आणखी एक भाऊ इब्राहिम कासकर वार्धक्याकडे झुकला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने तो औषधोपचार घेत आहे. दाऊदच्या इतर भावांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दाऊदचे साम्राज्य सांभाळण्यासाठी एकही विश्‍वासू वारसदार उपलब्ध नाही. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन नैराश्येच्या गर्तेत सापडला आहे.

मोईन राहतो मशिदीत; संपूर्ण कुराण मुखोद‍्गत इक्बाल कासकरने चौकशीच्या ओघात त्याचा पुतण्या म्हणजेच दाऊदचा मुलगा मोईन कासकरबद्दल आश्‍चर्यजनक माहिती दिली. ती अशी- 

मोईन दाऊद कासकर हा आता पाकिस्तानात अधिकृत मौलाना म्हणून ओळखला जातो. तब्बल 6 हजार 236 आयत असलेले पवित्र कुराण त्याला संपूर्ण मुखोद‍्गत आहे.  बिझनेस मॅनेजमेंटचा पदवीधर असलेला मोईन सुरुवातीला बापाला त्याच्या धंद्यात मदत करीत असे. हळूहळू तो बाजूला होत गेला. अत्यंत देखणा असलेला मोईन 2011 च्या सप्टेंबरमध्ये कराचीतील श्रीमंत कुटुंबातील कन्या सानिया शेखशी विवाहबद्ध झाला. त्याला तीन मुली आहेत. 

मोईनने कराचीतल्या पॉश अशा क्लिफ्टनमधील दाऊदच्या आलिशान बंगल्याचाही त्याग केला आहे. सध्या तो याच बंगल्याजवळील एका मशिदीत राहतो.     मशीद प्रशासनाने दिलेल्या एका लहानशा घरात मोईनचे कुटुंब राहते. मोईनची पत्नी सानिया आणि तीन मुलींनी त्याची साथ सोडलेली नाही.    मौलाना मोईन दाऊद कासकर रोज मुलांना पवित्र कुराण शिकवतो, सामुदायिक नमाजचे नेतृत्व करतो. शिवाय मौलाना म्हणून सर्व जबाबदार्‍या पार पाडतो.