Thu, Jul 18, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पद्मावतः चित्रपटगृहासमोर बाटल्यांचा स्फोट 

पद्मावतः चित्रपटगृहासमोर बाटल्यांचा स्फोट 

Published On: Jan 27 2018 11:56PM | Last Updated: Jan 27 2018 11:56PMडोंबिवली : वार्ताहर

करणी सेनेच्या विरोधानंतरही पद्मावत चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे चित्रपटाने अवघ्या दोन दिवसातच 50 कोटींची कमाई केली असली तरी दुसरीकडे मात्र अजूनही चित्रपट बघणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ज्वलनशील पदार्थ भरलेल्या बाटल्या फेकून स्फोट घडविणाऱ्या अज्ञातांनी या चित्रपटाला अशाही प्रकारे विरोध केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेकडील भानू-सागर थिएटरच्या समोर शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्या फेकल्या. या बाटल्यांचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. या आवाजामुळे नागरिकांची पळापळ झाली. अचानक घडलेल्या या स्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. एका दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी या बाटल्या फेकल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा लागला आहे. हा शो सुटण्याच्या दहा मिनिटे आधी हा स्फोट झाला. त्यामुळे पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या मनात दहशत पसरवण्यासाठी हा स्फोट केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. 

स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्यासह  पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी स्फोट का व कुणी केला, याबाबत तपास सुरू केला आहे. त्यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान पदमावत सिनेमास विरोध वाढत असून देशभरात हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. त्यातच थिएटर बाहेर करण्यात आलेल्या या स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली आहे.