Mon, Apr 22, 2019 22:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू

डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू

Published On: Apr 25 2018 6:19PM | Last Updated: Apr 25 2018 6:19PMबोर्डी वार्ताहर :  विरेंद्र खाटा

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील आगर लँडिंगपॉईंट येथे संशयास्पद वस्तू, आज बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आढळली. ही सीलबंद वस्तू अॅल्युमिनियम डब्यासारखी असल्याची माहिती ड्युटीवर उपस्थित सागरी सुरक्षारक्षकाने स्थानिक पोलिस आणि तटरक्षक दलाला दिल्यानंतर ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पालघर व ठाणे येथील बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. रात्रीच्या भरती वेळी ही वस्तू किनाऱ्यावर लागल्याचे बोलले जात होते.

दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण घटना स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संशयास्पद वस्तूंची पाहणी करत एक्सरे स्कॅनर च्या साहाय्याने स्कॅन करून पडताळणी केली असता, ती कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वस्तू २:३० वाजण्याच्या सुमारास स्फोट करून नष्ट करण्यात आली.

पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील यांनी बोलताना सांगितले की, सदर संशयास्पद वस्तू ऑईल कॅपेसीटर सारखी असून, ती मोठ्या जहाजाचा एखादा यांत्रिक भाग असावा अशी शक्यता वर्तविली, मात्र ती कोणत्याही प्रकारची स्फोटक व धोकादायक वस्तू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र डहाणू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पयर्टक येत असतात त्‍यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलण्याची गरज असल्याची मते स्थानिकांनी व्यक्त केली आहेत.