Sat, Aug 24, 2019 23:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे छोट्या वाचकांसाठी ग्रंथयान

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे छोट्या वाचकांसाठी ग्रंथयान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : अनुपमा गुंडे 

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणार्‍या ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने वाचकांच्या गरजेनुसार कात टाकण्यास पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. तरूण पिढीच्या बदलत्या वाचनांच्या गरजेनुसार ई - बुक्स आणि डिजिटलायझेशनच्या दृष्टीने ग्रंथसंग्रहालयाने वाटचाल सुरू केली आहे. नव्या - जुन्या पिढीबरोबर नव्याने वाचक तयार करण्यासाठी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय बालवाचकांसाठी फिरते ग्रंथयान सुरू करण्याचा मानस आहे. 

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय हे राज्यातल्या 5 आद्य ग्रंथालयपैकी एक. 1 जून 1893 साली या ग्रंथालयाची स्थापना झाली. सध्या ग्रंथसंग्रहालयाकडे 1 लाख 40 हजारांची ग्रंथसंपदा आहे. ठाणे स्टेशन जवळ सरस्वती आणि नौपाड्यात शारदा अशा दोन शाखा असून 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उर्वरित निधीतून फिरते ग्रंथालय (मोबाईल व्हॅन) खरेदी केली आहे. या फिरत्या ग्रंथालयाचे  1 हजार 250 वाचक आहेत, तर संग्रहालयाच्या दोन्ही शाखांमध्ये 7 ते 8 हजार वाचक आहेत. ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात 10 हजार सभासद करण्याचा संग्रहालयाचा मानस असल्याचे ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर यांनी दैनिक पुढारीशी बोलंताना सांगितले.

ग्रंथसंग्रहालयाने नव्या पिढीची वाचनांशी नाळ  जोडण्यासाठी डिजिटलायझेशनचा उपक्रम हाती घेतला आहे. जी पुस्तके डिजिटलायझेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत, ती पुस्तके वगळून अन्य पुस्तके आम्ही नव्या पिढीसाठी डिजिटलायझेशन करत आहोत, याशिवाय जी ई - बुक्स वाचकांसाठी उपलब्ध होतील,ती  पुस्तकेही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. संग्रहालयात 16 व्या,17 व्या आणि 18 व्या शतकातील अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. यात पेशव्यांची बखर, मराठ्यांची बखर, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, मोरोपंतांची आर्या, मस्त्यपुराण, हिंदुस्थानचे भूगोल पत्रक, अंक गणिताची मूळपीठिका, अभंग भारत, जगाचा संक्षिप्त इतिहास अशी दुर्मिळ पुस्तके आहेत. संग्रहालयाने या दुर्मिळ पुस्तकांचा खजिना जपला आहे. तो नव्या पिढीला उपलब्ध व्हावा यासाठी या पुस्तकाचे डिजिटलायझेशन आवश्यक  आहे. काही दुर्मिळ पुस्तकांचे  ग्रंथालयाच्यावतीने लॅमिनेशन करण्यात आल्याचे वालावलकर यांनी सांगितले.


  •