Wed, Apr 24, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समीर भुजबळ यांना जामीन मंजूर

समीर भुजबळ यांना जामीन मंजूर

Published On: Jun 06 2018 5:52PM | Last Updated: Jun 06 2018 5:52PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज(दि. ६ जून) मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असे म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता. विविध कायदेशीर मुद्यांवरील त्यांचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी आज दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी ठेवली होती. आज सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्तींनी जामीन अर्जावर निर्णय देत समीर यांना जामीन मंजूर केला. 

याच गुन्ह्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर आपल्याला जामीन द्यावा, यासाठी समीर भुजबळांनी हायकोर्टात अर्ज केला होता. छगन भुजबळ  याच गुन्ह्यांच्या आरोपाखील तुरुंगात होते. त्‍यांना सव्वा दोन वर्षांनंतर  जामीन मंजूर केला आहे.

Tags : bombay high court,  sameer bhujbal,  money laundering case