Tue, May 21, 2019 18:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोतया सीबीआय अधिकार्‍याचा लाखोंचा गंडा

तोतया सीबीआय अधिकार्‍याचा लाखोंचा गंडा

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:47AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

आपण सीबीआय एसपीजीमध्ये हेड असल्याची बतावणी करीत एफएलचे लायसन्स काढून देण्याचे तसेच नोकरीला लावण्याचे आमिष दाखवीत सहा जणांना 85 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक केल्यानंतर तोतया अधिकार्‍याने पोबारा केला. अखेर फसवणूक झाल्याने महेश पालीवाल यांनी आरोपी चौकडीवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत. 

नालासोपारा येथे राहणारा आरोपी अनंतप्रसाद पांडे याने ठाण्यातील हिरानंदानी स्टेट परिसरात राहणार्‍या फिर्यादी महेश पालीवाल यांना आपण सीबीआयमध्ये एसपीजी हेड असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर पालीवाल यांचा विश्‍वास संपादन करीत एफएलचे लायसन्स काढून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले. 

याच लायसन्सच्या  बहाण्याने आरोपीने फिर्यादी पालीवाल यांच्याकडून 16 लाख 26 हजार रुपये घेतले. तसेच त्याचे नातेवाईक खिबचंद सेवानी यांना म्हाडाचे दुकान घेऊन देतो अशी बतावणी करत तब्बल 50 लाख उकळले. तर कांतीलाल पटेल यांना देखील आरोपी अनंत प्रसाद याने रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये स्टॉल घेऊन देण्याचे स्वप्न दाखवत 3 लाख घेतले. इतकेच नव्हे तर भरत पटेल व केतन पटेल यांच्या चार नातेवाईकांना रेल्वेत टीसी पदावर लावण्यासाठी 18 लाख 75 हजार रुपये घेतले होते.