Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संकटांचे ढग बरसले; मुंबईसाठी अ'मंगळ'वार!

संकटांचे ढग बरसले; मुंबईसाठी अ'मंगळ'वार!

Published On: Jul 03 2018 7:08PM | Last Updated: Jul 03 2018 7:07PMशंकर पवार : पुढारी ऑनलाईन

आज पुन्‍हा एकदा मुंबई विविध दुर्घटनांनी स्‍तब्‍ध झाली. आजचा मंगळवार हा मुंबईकरांसाठी सकाळपासूनच संकटे घेऊन येणारा ठरला. धो-धो कोसळणारा पाऊस, पूल कोसळल्याने बंद पडलेली जीवनवाहिनी लोकल, तळे साचल्याप्रमाणे रस्‍त्यावर पाणी, कुठं भूस्‍खलन, कुठं लागलेल्या आगी, तर कुठे डबल डेकर बसचा अपघात अशी एकामागून एक संकटे मुंबापुरीवर आली. परंतु या सगळ्या निसर्ग प्रलयातही एक मंगलमय बाब म्‍हणजे या सर्व दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मुंबईत सोमवारपासून पावसाचे कोसळणे सुरूच आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पूल कोसळला. यामुळे जीवनवाहीनी असणारी लोकल बंद पडून मुंबई काही काळासाठी थांबली. परंतु या सर्व घडामोडी घडत असतानाच राजकीय चिखलफेक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. दुर्घटना घडल्या की जबाबदारीची टोलवा-टोलवी तशी मुंबईकरांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. याची प्रचिती आजच्या दुर्घटनेनंतरही आली. 

सत्तेत असूनही विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्‍हा तु -तु -मै- मै सुरू झाली. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अपघाताला रेल्‍वे विभागाला जबाबदार ठरवत या प्रकरणातून नामानिराळे होण्याचा प्रयत्‍न केला. रेल्‍वे खाते भाजपकडे असल्याने शिवसेनेने या दुर्घटनेची जबाबदारी रेल्‍वे खात्यावर टाकली. जबाबदार कोण ते नंतर पुढे येईल. कालांतराने त्याची कुणाला गरजही वाटणार नाही. परंतु मुंबईकर हैराण असताना भाजप-सेनेचे लुटुपुटूचे युद्ध पुन्‍हा सुरू झाले. 

दुसरीकडे दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला तात्‍पुरती जाग येते याचा पुन्‍हा एकदा प्रत्यय येणार आहे. एल्‍फिस्‍टन सारख्या दुर्घटनेतून रेल्‍वे प्रशासनाने कोणताही बोध घेतला नसल्याचेच पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले. या अपघातात लोकलच्या मोटरमनचे प्रसंगावधान कामी आले नाहीतर मुंबईला पुन्‍हा एकदा मोठ्या प्रलयाला सामोरे जावे लागले असते. अशा आघातांना रोजच मुंबापुरीला सामोरे जावे लागते. रेल्‍वे अपघातात तर रोज ३-४ बळी जातात. तसे हे नित्याचेच पण एवढ्या सगळ्यात जबाबदार लोकांचं बेजबाबदार वागणं मात्र धक्‍कादायक आणि चिंताजनक आहे. 

मुंबई तसं राजधानीचं शहर. देशाची आर्थिक राजधानी, महाराष्‍ट्राची राजधानी, बॉलिवूडकरांची राजधानी येथूनच सर्व क्षेत्रांची सूत्रं हालत असतात. त्यामुळे ही राजधानी ताब्यात घेण्यासाठी सगळेजण उतावीळ आहेत. परंतु सध्याचं मुंबईकरांच्या किड्यामुंग्यांप्रमाणे जगण्याचं सोयरसुतक कोणत्याही सत्ताधीशाला नसल्याचं दिसतं. कुठं उघड्या नाल्यात पडून माणसं मरतात तर कुठं पूल कोसळून परंतु वाद होतो तो जबाबदार कोण यावरून. जबाबदार केंद्र सरकार असो,  राज्य सरकार असो, की महानगरपालिका यापेक्षा अशा घटना घडू नयेत म्‍हणून या सर्वांनी कितपत काळजी घेतली ते महत्त्‍वाचे आहे. 

मुंबई लोकसंख्येच्या दृष्‍टीनं जगातील चौथ्या क्रमांकाचं शहर. बेटांवर वसलेलेल्या या शहराला गेल्या काही काळात असे अनेक आघात सहन करावे लागले आहेत. आग, इमारत कोसळणं आणि रेल्‍वे पुल कोसळणं अशा दुर्घटनांमुळे मुंबई कित्येकदा हादरली आहे. यात कित्येक मुंबईकरांना जीवनास मुकावे लागले आहे. कमला मील मधील आग(१४ ठार), भेंडीबाजार इमारत दुर्घटना (३४ ठार) आणि एल्‍फिस्‍टन रोडवरील चेंगराचेंगरी(२३ ठार) या दुर्घटनांनी मुंबईत हकनाक बळी गेले. तसे पाहाता अशा दुर्घटनेत मुंबईत जाणारे बळी हे प्रशासन आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचेच बळी ठरले आहेत.

सप्‍टेंबर २०१७ मध्ये झालेली एल्‍फिस्‍टन दुर्घटना तर टाळता आली असती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याने मुंबईत संतापाची लाट उसळली होती. तेव्‍हाही जबाबदारीचं नाट्य रंगलं ते तेवढ्यापुरतंच. मुंबईतील पुलांसाठी निधी जाहीर झाला, पुलांची तपासणी झाली, नवीन पुलांच्या उभारणीबाबत धोरणे ठरली. परंतु एवढं सगळं होऊनही वर्षभराच्या आतच पुन्‍हा मुंबईला पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला सामोरे जावं लागलं. हे खरोखरंच दुर्दैवी आहे. मुंबईत बुलेट ट्रेन येवो की न येवो परंतु सध्याच्या लोकलसेवेत मात्र आवश्यक सुधारणा होणं गरजेचं आहे. 

पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी तसेच त्याच्या देखभालीचे उत्तरदायित्व सर्वांवर आहे. एखाद्या दुर्घटनेनंतर जबाबदारी ठऱवण्यापेक्षा अगोदरच जबाबदार असणे गरजेचे आहे. सामान्य मुंबईकरांची एवढीच अपेक्षा असणार आहे की सर्वच सत्ताधार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. सामान्य मुंबईकरांचा प्राण कधीही राजकीय चालींपेक्षा निश्‍चितच महत्त्‍वाचा आहे. असे झाले तर वारंवार मुंबईवर बरसणारे संकटांचे ढग सामान्य मुंबईकरांचा बळी घेणार नाहीत.