Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुदक्षिणा

ब्लॉग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुदक्षिणा

Published On: Apr 14 2018 8:42AM | Last Updated: Apr 14 2018 8:42AMडॉ. जे.एन. गायकवाड

प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना खूप त्रास व अपमान सहन करावा लागला. दुसर्‍या एखाद्या विद्यार्थ्याने शाळा सोडली असती, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांच्या संस्कारामुळे शाळा सोडली नाही. सर्व प्रकारचा त्रास सहन करीत चिकाटीने ते शिक्षण घेत राहिले.

सातार्‍याच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. त्यामुळे त्यांची जीवनरेषाच बदलली. शाळेमध्ये पेंडसे आणि आंबेडकर नावाचे दोन ब्राह्मण शिक्षक होते. ते मनाने निर्मळ, सरळ साधे होते. जातिभेद, शिवाशिव ते मानत नव्हते. विद्यार्थ्यांवर ते प्रेम करायचे.

आंबेडकर गुरुजींचा भीमावर फारच जीव होता. ते घरातून जेवणाचा डबा आणून दुपारच्या जेवणाच्या वेळी भीमाला बोलावून दोघेजण जेऊ लागले. दोघांमधील प्रेम आणि आपुलकी दिवसेंदिवस वाढतच गेली. भीमाचे आंबवडेकर हे नाव त्यांना कसेसेच वाटे. त्यांनी एके दिवशी भीमाला जवळ बोलावून प्रेमाने विचारले, ‘भीमा, मला तुझे आंबवडेकर नाव बरे वाटत नाही. तुला माझे आंबेडकर हे नाव दिल्यास चालेल का?’

भीमाने चटकन होय म्हणून सांगितले. गुरुजींना खूप आनंद झाला. त्यांनी लगेच शाळेच्या रजिस्टरमध्ये भीमाचे नाव ‘भीमराव आंबेडकर’ असे नोंदविले. त्या क्षणापासून म्हणजे नावात बदल झाल्यापासून भीमामध्ये खूप बदल झाल्याचे दिसू लागले. 

यानंतर ते एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिक पास झाले व पुढे याच महाविद्यालयामधून बी.ए. सुद्धा झाले. पुढे त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विश्‍वविद्यालयात तसेच इंग्लंडमधील विश्‍वविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले हे सर्वांना माहिती आहेच. विश्‍वविद्यालयामधील प्रा. मुल्‍लर, प्रा. एडविन, आर. ए. सोलिग्मन इ. प्राध्यापकांचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यांच्यामध्ये गुरू-शिष्याचे खरे नाते होते. तसेच समाजसुधारक सीताराम बोले व गुरुवर्य कृष्णाजी केळूसकर यांचेही त्यांना जन्मभर मार्गदर्शन मिळाले. बाबासाहेब आपल्यावर प्रेम करणार्‍या सर्व शिक्षकांचा मोठ्या आदराने, नम्रतापूर्वक वेळोवेळी उल्‍लेख करून आपला आदर व्यक्‍त करीत होते.

बाबासाहेब लंडनहून परत येत असताना पहिले महायुद्ध सुरू होते. लंडनहून दोन जहाजे मुंबईकडे निघाली होती. एका जहाजामध्ये बाबासाहेबांनी आपली पुस्तके ठेवली होती व स्वत: दुसर्‍या जहाजामधून प्रवास करीत होते. या दोन जहाजांपैकी एक जहाज जर्मनीने बॉम्बने उडवून दिले. पण, बाबासाहेब दुसर्‍या जहाजात होते. हे जहाज मुंबईस सुखरूप पोहोचले. सर्वांना आनंद झाला. त्यावेळी अनेक मित्र व नातेवाईक त्यांना भेटण्यास येत होते. नेहमी घरात गर्दी असे.

दिनांक 22 जून 1924 रोजी रविवारी बाबासाहेब काही लोकांशी गप्पा मारीत बसले असताना एक वृद्ध गृहस्थ आपल्याला भेटावयास येत आहेत हे बाबासाहेबांनी पाहिले. ते ताडकन उठले आणि बाहेर येऊन त्या वृद्ध गृहस्थास साष्टांग नमस्कार घातला. ते गृहस्थ गहिवरलेल्या आवाजात म्हणाले ‘चिरंजीव हो !’ नंतर बाबासाहेबांनी त्यांना आदराने आत आणून आपल्या खुर्चीत बसविले व जमलेल्या लोकांना सांगितले की ‘हे माझे गुरुजी, आंबेडकर’ सर्व लोकांनी उठून त्यांना नमस्कार केला. आंबेडकर गुरुजी उपरण्याने डोळे पुसत सर्वांचे  नमस्कार  स्वीकारीत होते. या भेटीच्या आनंदाची उर्मी निवळल्यानंतर गुरुजी म्हणाले, ‘भीमा तू तुझ्या कुळाचे नाव तर उजळ केलेसच, पण मलाही तुझ्यामुळे यश प्राप्‍त झाले.’

गुरू-शिष्याच्या अशा गप्पा दीड-दोन तास चालल्या होत्या. नंतर गुरुजी जाण्यास निघाले. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ‘गुरुजी, मी अजुनी कमाईस सुरुवात केलेली नाही. तरी पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावी अशी माझी इच्छा आहे.’

तेव्हा आंबेडकर गुरुजी उत्तरले, ‘भीमा, तू जी अफाट विद्या संपादन केलेली आहेस तीच मला गुरुदक्षिणा म्हणून मिळाली आहे. जगात तुझा नावलौकिक व्हावा एवढीच माझी इच्छा आहे.’ पण, बाबासाहेबांनी गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला व ते म्हणाले, ‘मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला ती दक्षिणा देईल. कधी येऊ?’ गुरुजी म्हणाले,‘हे बघ, आमचे घर म्हणजे सोवळ्याचे आगर ! तिथे तुझा अपमान झाला तर ते मी कसे पाहू? मीच येतो तुझ्याकडे गुरुवारी.’ नंतर आंबेडकर गुरुजी ठरल्याप्रमाणे गुरुवारी 26 जून1924 रोजी सकाळी 9 वाजता साहेबांच्या ऑफिसात आले. बाबासाहेबांची एवढी मोठी लायब्ररी बघून त्यांना आश्‍चर्य वाटले व आनंदही झाला.


बाबासाहेबांनी पाच पाने, पाच सुपार्‍या, नऊवारी साडी, एक धोतर आणि सव्वा रुपये एका छोट्या परातीत ठेवून ती गुरुजींच्यापुढे ठेवली. नंतर त्यांनी गुरुजींना ‘साष्टांग नमस्कार’ घातला. गुरुजींचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. त्यांनी बाबासाहेबांची पाठ थोपटली आणि मनात आशीर्वादाचे शब्द गुणगुणले. नंतर थोड्या गप्पागोष्टी झाल्या. गुरुजी हळव्या अंत:करणाने हळूहळू चालत निघून गेले. नंतर ते कोकणात निघून गेले. हीच गुरुशिष्याची शेवटची भेट !! असे गुरू-शिष्य पुन्हा होणे नाही. आणखी एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्‍लेख करीत आहे. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की माझे सर्व घरच धार्मिक होते. माझे वडील आम्हा दोघा भावांना देवापुढे बसवून अभंग, भजने, दोहे म्हणावयास सांगावयाचे. प्रार्थनाही करण्यास सांगत होते. वडील रामायण-महाभारतातील गोष्टी रंगवून सांगायचे. या सर्वांचे माझ्या मनावर चांगले संस्कार झाले. या सर्वांमुळे माझ्या आयुष्याचा पाया चांगला घातला गेला असावा. इतकेच नव्हे तर साप्‍ताहिक, पाक्षिक व माझे इतर वाङ्मय यामुळेच आणखी वजनदार व समृद्ध झाले असावे, अशी माझी समजूत आहे. ज्यामुळे आपण घडलो आहोत त्याबद्दल बाबासाहेबांनी दाखविलेली केवढी ही कृतज्ञता ! आपल्याला ज्ञान देणार्‍या, विद्या देणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या लोकांच्याबद्दल आदर, कृतज्ञता बाळगणारी माणसेच जीवनामध्ये नेहमी मोठी होतात अशी माझी समजूत आहे.