Thu, Jun 27, 2019 13:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : सर म्‍हणू नका ओ, शिवी वाटतेय!

ब्लॉग : सर या शब्दाची लाज वाटतेय!

Published On: Feb 20 2018 7:37PM | Last Updated: Feb 20 2018 7:37PM
शंकर पवार, पुढारी ऑनलाईन

काय सर? काय चाललंय? या साध्या प्रश्नाला समोरून उत्तर आलं. सर, तेवढं म्‍हणू नका ओ, शिवी दिल्यागत वाटतंय. एवढी सर या शब्दाची चीढ बघून थोडंसं विशेष वाटलं.  पण, एका तासिका तत्त्‍वावर प्राध्यापकी (हमाली) करणार्‍या प्राध्यापकाची व्यथा ऐकून या 'सर' शद्बाबद्दल त्यांच्या मनात एवढा राग का? याचे उत्तर मिळाले. 

घरची परिस्‍थिती बेताची असताना, स्‍वत:च्या कष्‍टावर उच्‍च शिक्षणापर्यंत मजल मारली. कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी लागणार्‍या सर्व पदव्या मिळवल्या. पण, आजपर्यंतही सन्‍मानाने 'सर' म्‍हणवून घ्यायची लाज वाटते. अशा शब्दात एक उच्‍च विद्याविभूषित तरूण बोलत होता. 

पाचवीपासून ते एमएच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारने जे कॉलिफिकेशन ठरवून दिले. ते सर्व पूर्ण केलं. बीए केलं. बीएड केलं. एमए, सेट, नेट, पीएच.डी सुद्धा केली.  प्राध्यापक नाही तर, शिपायाची तरी नोकरी मिळेल अशी आशा घेऊन वाटच बघत राहिलो. सन्‍मानाने जगण्यासाठी कोणते कॉलिफिकेशन आहे. तेच समजत नाही, असे तो म्‍हणाला.

गावातील शाळेत दहावी पर्यंतचं शिक्षण केलं. उच्‍च माध्यमिक आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षणही कमवा व शिका योजनेतून केलं. तेव्‍हाच कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न पाहिलं होतं. त्यानुसार सीईटी देऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये बीएडसाठी प्रवेश मिळवला. चांगल्या गुणांनी बीएड उत्तीर्ण झालो. त्याच काळात राज्य सरकारनं शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केली. पुन्‍हा आशावादी झालो. आता ही परीक्षा पास झालो की मिळेल नोकरी या भाबड्या आशेनं. 'टीईटी'ही पहिल्याच प्रयत्‍नात पास झालो. त्यानंतर सरकार शांत झालं. माझ्या आशावादी जीवनाचा पुढचा प्रवास सुरूच होता. 

एमए, बीएड झालो तरी नोकरी नाही. टीईटीचाही उपयोग नाही. म्‍हणून शेतात कामाला जाण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्याची इच्‍छा स्‍वस्‍थ बसू देत नव्‍हती. पुन्‍हा सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा 'सेट' व 'नेट'ची तयारी सुरू केली. दरम्यान, पीएच. डीला प्रवेश घेऊन डॉक्‍टर होण्याचंही स्‍वप्‍न पाहिलं. केवळ शिक्षण जगवू शकत नाही, त्यामुळे नोकरी शोधतच होतो, असा प्रवास तो सांगत होता. 

एका खासगी महाविद्यालयात तासिका तत्त्‍वावर रूजू झालो. दरम्यान, राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी पुन्‍हा अभियोग्यता चाचणी घेण्याचे ठरवलं. एवढं सगळं झाल्यावर ती परीक्षाही दिली. त्याचंही असंच झालं. पुढं काय झालं समजलंच नाही. सध्या मानधन मिळतंय ७ हजार रुपये. तेही  त्या त्या महिन्याला नाही. निम्‍मी रक्‍कम महिन्याला मिळते आणि उर्वरित वर्षाच्या शेवटी. तर मग तुम्‍हीच सांगा. ३ ते ४ हजार रुपयांत आयुष्याची २७-२८ वर्षे शिक्षणात घालवलेल्या तरुणाने करायचे काय? आणि जगायचं कसं? त्याचा हा प्रश्न विचारात पाडणारा होता.

प्राध्यापक म्‍हणून राहायचं म्‍हटलं तरी पदरमोड करावी लागते. एवढं शिकूनही घरी पैसे मागून राहावं लागतं. कधी कधी जगण्याचीही लाज वाटते. गावी गेलं तरी लोक विचारतात. काय कराताय सर? झालं का नाही शिक्षण? अजून किती राहिलंय शिकायचं? मग याच 'सर' शब्‍दाची लाज वाटते. एवढंच नाहीतर कुणी सर म्‍हटलं तर तो सन्‍मान नाही तर शिवी वाटते, असे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी आले. 

शिक्षण व्यवस्‍थेचे आणि शिक्षणाचे वास्‍तव सांगत होता, एक उच्‍च विद्याविभूषित तरुण. शिक्षक होण्यासाठी झगडणारा आणि शिक्षक होण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. कदाचित थोड्याफार फरकाने असेच आशादायी तरुण राज्यात अनेक आहेत. शिक्षक होण्यासाठी पैसे भरण्याची ऐपत नसलेले.