Tue, May 21, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : कोल्हापुरी भाषेचा 'खुळा रस्सा'

ब्लॉग : कोल्हापुरी भाषेचा 'खुळा रस्सा'

Published On: Mar 24 2018 6:07PM | Last Updated: Mar 24 2018 7:17PMरविराज गायकवाड, पुढारी ऑनलाईन

कोल्हापुरी भाषा ही खूपच वेगळी आहे. त्यात एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे. इथं शिव्याही प्रेमानं दिल्या जातात. शाळेत पोरं एकामेकांना बापाच्या नावनं हाक मारतात. हे पुढं मोठे झाल्यानंतरही अनेक वर्षे चालतं. काहीही बोलायच्या आधी 'ते नव्हं'  म्हणत सुरुवात करणं, हे कोल्हापुरी भाषेचं एक छोटं वैशिष्ठ्य आहे. त्या भाषेवर, भाषेच्या गोडव्यावर कोल्हापुरी माणूस गुळा एवढचं प्रेम करतो. त्याच्या ताटात जर खुळा रस्सा (पंगतीत संपत आलेल्या मटणाच्या रश्यात पाणी घालून उकळलेला रस्सा) वाढला, तर ते खवळणार की. तसचं काहीस एका सिरिअलचं झालंय.

गेल्या काही वर्षांत सिनेमाचा पडदा जेवढा प्रभावी ठरला नाही, तेवढ्या प्रभावी टीव्हीवरच्या सिरिअल्स ठरल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत. पूर्वी मुंबई, पुण्यातल्या सूखवस्तू कुटुंबांमध्ये घडणारी स्टोरी आता ग्रामीण भागात आलीय. एखादी सिरिअल मुंबईतच घडत असली, तरी त्यात एक तरी कॅरेक्टर छोट्या शहरांमधलं, असलचं पाहिजे, अशी अटच जणू लेखकाला घातली जात असल्याचं दिसतंय. यात 'हम तो तेरे आशिक है' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या दोन सिरिअल्सचा उल्लेख करावा लागले. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील वाढता ऑडियन्स लक्षात घेऊन ही कॅरेक्टर्स सिरिअल्समध्ये घेण्यात आली असली, तरी त्या कॅरेक्टर्सच्या भाषांवर म्हणावं तितकं बिनचूक काम झालंय असं वाटत नाही. 

'हम तो तेरे आशिक है' प्रसाद ओक एका कोल्हापुरी माणसाचं कॅरेक्टर रंगवत आहे. प्रसादला पिळदार मिशा शोभत असल्या तरी, त्यांच्या तोंडून येणारी भाषा ही कोल्हापुरी अजिबात वाटत नाही. त्याची भाषा म्हणजे मध म्हणून काकवी गळ्यात मारल्या सारखं आहे. प्रसाद रंगवत असलेल्या संग्राम वाघमारेच्या तोंडी काही मोजके कोल्हापुरी शब्द देण्यात आल्याचं दिसतंय. पण, कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्यात कुठचं सापडत नाही. यासाठी काही उदाहरणं द्यावी लागतील. 

एका एपिसोडमध्ये पुष्कर गुप्ते (पुष्कर श्रोत्री) एका सेल्स गर्ल बरोबर घरात सगळ्यांना सापडतो, असा प्रसंग होता. त्यात प्रसाद अर्थात संग्राम 'काय करतुय रं नादखुळा?' अशी रिअॅक्शन देतो. अता कोल्हापुरात नाद खुळा या शब्द प्रयोगाचा अर्थ अतिउत्तम, अतिसुंदर, अप्रतिम अशा अर्थानं आहे. त्यामुळं हा नादखुळा शब्द प्रयोग इथं कशासाठी? संग्राम बायकोशी बोलताना 'तू काय त्याच्या नादाला लागती?' असं म्हणतो. तर हाच संवाद अस्सल कोल्हापुरी भाषेत 'तू तेज्या कशाला नादाला लागल्यास? किंवा लागत्यास?' असा होईल. संग्राम देत असलेल्या 'काय रे चुचखुळ्या? ए नरसाळ्या?' ह्या शिव्या तर कोल्हापुरात कधीच ऐकायला मिळत नाही. मिळणारही नाहीत. एक-दोन वेळा संग्रामच्या तोंडी 'अन् मंग', ऐकण्यात आलंय. आता 'अन् मंग' हे सोलापूर किंवा नगर पट्ट्यात ऐकायला मिळतं. ते कोल्हापुरी सांगणाऱ्या माणसाच्या तोंडी कसं काय? त्यामुळं या सिरिअलमधलं कथित कोल्हापुरी ऐकवत नाही. कोल्हापूर बाहेरच्या अगदी सातारा, सांगली बाहेरच्या माणसाच्या हे लक्षात येणार नाही. पण, ज्यानं एखादा

कोल्हापुरी माणूस मित्र, नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकाऱ्याच्या रुपानं जवळून पाहिलाय त्याच्या मात्र हे पटकन लक्षात येईल. सिरिअलमध्ये दाखवण्यात आलेले संग्रामचे वडील. कायम सोफ्यावर फेटा बांधून बसलेले दिसतात. आता असं कोण रोज फेटा घालून बसत नाही कोल्हापुरात. आता ज्याला कोल्हापूर माहिती नाही. त्याचा कोल्हापुरात राजस्थान सारखं सगळीच फेटा घालून फिरतात, असा गैरसमज व्हायचा. हे म्हणजे कसंय, मुंबई पुण्यातल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या व्हेज कोल्हापुरी डिश सारखं आहे. तिखट घालून केलेली भाजी म्हणजे 'निस्ता जाळ'. पण, 'जाळ अन धूर संगट' आल्यावरच त्या डिशची मजा येऊ शकते. त्यासाठी कोल्हापुरी मसाला आणि त्याचं वाटण वेगळं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. शहरात जन्मलेल्या आणि शहरातच वाढलेल्या माणसानं ग्रामीण भागातली भाषा बोलण्याचा प्रयत्न करणं, असा प्रकार संग्राम वाघमारे या कॅरेक्टर बाबतीत झालाय. 

मध्यंतरी एका सिरिअलच्या बाबतीत असाच प्रकार झाला होता. 'मालवणी डेज' या सिरिअलचं नाव खूप आकर्षक वाटलं होतं. पण, त्यातही मालवणी भाषेचा लहेजा नव्हता. भाषेचे हेल खूपच चुकीचे होते. अर्थात त्यामुळंच ती सिरिअल फारशी चालली नाही. गेल्या वर्षी 'रात्रीस खेळ चाले' ही सिरिअल पहायला मिळाली. त्यात मात्र, स्थानिक कलाकारांना थोडी जास्त संधी मिळाल्यानं बदल जाणवला. त्यामुळं ती सिरिअल 'मालवणी डेज' पेक्षा वेगळी वाटली आणि त्यानंतर आता 'गाव गाता गझाली'ची सगळी टिमच स्थानिक कलाकारांची. त्यामुळं त्या सिरिअलला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली. कोकणात मालवणी वेगळी, बाणकोटी वेगळी, राजापुरी वेगळी आणि कोकणीही वेगळी आगरी तर त्याहून वेगळी. हे या पट्ट्यातल्या भाषेचं वेगळंपण आहे. ते वेगळेपण, मच्छिंद्र कांबळींनी वस्रहरण आणि संतोष पवारनी त्यांच्या अनेक नाटकांतून जपलं होतं.  ही दोन्ही माणसं मुंबईत राहत असली, तरी त्यांची ग्रामीण भागाशी नाळ कायम होती. म्हणूनच ते शक्य झालं. 

सध्या तुझ्यात जीव रंगला ही सिरिअल कोल्हापुरातच घडतेय. त्याचं शुटिंगही कोल्हापूरजवळच्या वसगडे गावात होतं. त्या सिरिअलमध्ये येणारा टोन हुबेहुब कोल्हापुरी असतो. स्थानिक कलाकारांची संख्या जास्त असल्यानं, भाषेचा टोन कुठं सरकल्यासारखा वाटत नाही. त्यामुळचं राणादाच्या तोडचं 'चालतंय की' जास्त फेमस झालंय. आता हे की म्हणायची एक स्टाईल आहे. ते कोल्हापूरच्या पाण्यातच आहे. त्यासाठी इथं येऊन राहिलं इथलं पाणी पिलं, तरच ते येतं. तसच लागीरं झालं जी या सिरिअलचं आहे. कोल्हापुरी आणि सातारच्या भाषेत फरक आहे. समोरच्या 'ए' म्हणण्यातही दोन्हींमध्ये फरक आहे. हा फरक दोन्ही सिरिअल्स बघताना जाणवतो. 'माझ्या नवऱ्याची बायको'मधल्या राधिकाच्या तोंडी असणारी वऱ्हाडी यावरही काहींचा आक्षेप आहे. मुळात वऱ्हाडी आणि नागपुरी वेगळी आहे. नागपूर, चंद्रपूर पट्ट्यात 'गाडी चालली गेली' म्हणजे गाडी निघाली किंवा सुटली, असं म्हटलं जातं. (आता त्याविषयी सविस्तर लिहित नाही.) पण, जर सिरिअल्समध्ये खरचं ग्रामीण किंवा छोट्या शहरांमधील कॅरेक्टर्स घ्यायची असतील, तर भाषेचा लहेजा जपायला हवा, एवढं मनापासून वाटतं. 

मुळात इंटरनेटच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे व्हिडिओ स्थानिक भाषेत डबिंग होतायत. त्या त्या भागातली भाषा थेट आपल्याला मिळू लागलीय. साताऱ्यातील 'गावाकडच्या गोष्टी' हे यू-ट्यूब चॅनेल त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता या 'गावाकडच्या गोष्टी' सारखचं  तुझ्यात जीव रंगला किंवा लागीरं...मधून ग्रामीण मातीचा सुगंध येत असले, तर कृत्रिमपणा असलेलं अत्तर घेणार कोण? किंवा असली भेसळयुक्त कोल्हापुरी मिसळ खाणार कोण?

 Tags : kolhapur, kolhapur news, blogs on Kolhapur, kolhapuri language, Marathi Language, Marathi Serials, hum to tere aashiq hai marathi serial, lagira zala ji, tuzyat jiv rangala