Wed, Jun 26, 2019 03:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप सहा जागांवर नवीन चेहरा देणार? 

भाजप सहा जागांवर नवीन चेहरा देणार? 

Published On: Mar 14 2019 7:29PM | Last Updated: Mar 15 2019 3:18PM
मुंबई : दिलीप सपाटे

भाजप उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे. त्यात पाच ते सहा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या ठिकाणी नवे चेहरे दिले जाणार असल्याची चर्चा आहे. 16 मार्चला भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सोलापूरचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, जळगावचे खा. ए. टी. नाना पाटील आणि अहमदनगरचे खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कट करण्याची शिफारस राज्य भाजपने केंद्रीय संसदीय मंडळाला केली आहे; तर रावेरच्या खा. रक्षा खडसे, ईशान्य मुंबईचे खा. किरीट सोमय्या आणि लातूरचे खा. सुनील गायकवाड हे देखील धोक्यात असल्याचे समजते. पुण्यातून विद्यमान खा. अनिल शिरोळे किंवा पालकमंत्री गिरीश बापट, तर सांगलीतून खा. संजय पाटील की जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी द्यायची, यावरही अजूनही खल सुरू आहे.

गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर टीमच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीमध्येही राज्यातील प्रचार रणनीती आणि उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. सुजय विखे भाजपमध्ये दाखल झाल्याने अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. सोलापूरचे खा. अ‍ॅड. शरद बनसोडे निष्क्रिय ठरल्याने त्यांचेही तिकीट कापण्यात आले असून, तेथे बेडा जंगम समाजातील जयसिद्धेश्‍वर स्वामींचे तिकीट निश्‍चित मानले जात आहे. तर, जळगावचे खा. ए. टी. नाना पाटील यांचे तिकीटही कापले जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

एकनाथ खडसे यांची सून असलेल्या खा. रक्षा खडसे यांची उमेदवारीही धोक्यात असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्‍वासू असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नावाचा विचार सुरू आहे. मात्र, रक्षा खडसे यांचे तिकीट कापले, तर एकनाथ खडसे कोणती भूमिका घेतील आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचे कोणते परिणाम होतील, याचीही चाचपणी केली जात आहे. लातूरचे खा. सुनील गायकवाड यांच्याऐवजी आ. सुधाकर भालेराव यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. उमेदवारी वाचविण्यासाठी सुनील गायकवाडही जोरदार प्रयत्न करीत आहेत. 

किरीट सोमय्या यांचे आणि शिवसेनेचे संबंध सध्या बिघडलेले आहेत. युती झाली तरी किरीट सोमय्या यांना मदत करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतली आहे. शिवसेनेवरील जहरी टीकेमुळे स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सोमय्या यांना विरोध आहे. दोन्ही पक्षाची युती जाहीर करताना उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी सोमय्या यांना तेथून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नाराजीचा फटका सोमय्या यांना बसू शकतो.

पुण्यातून खा. अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीला फारसा विरोध नाही. मात्र, गिरीश बापट यांनी दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यामुळे दोघांची नावे दिल्लीला पाठविण्यात आली आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, सांगली लोकसभा मतदार संघातून संजय पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांची नावे पाठविण्यात आली आहेत. संजय पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असाच मतप्रवाह राज्य भाजपमध्ये आहे.

अधिक वाचा : 'तुप खाऊन मदमस्त झालेले नातू-पणतू तुम्हाला लखलाभ'!

अधिक वाचा : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; साताऱ्यात उदयनराजे, माढा आणि नगर अजूनही गुलदस्त्यात

अधिक वाचा : मुलेच काय, नातवंडेही पळवू; गिरीश महाजन