Tue, Jul 23, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभेसाठी भाजप-सेना एकत्रच!

लोकसभेसाठी भाजप-सेना एकत्रच!

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 2:07AMमुंबई : उदय तानपाठक

देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ टिकलेली युती यापुढेही कायम रहावी, यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन केलेली शिष्टाई अखेर फळास आली आहे. आगामी लोकसभा आणि शक्य झाल्यास विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्यात शहा यांना यश आल्याचे समजते. 

लगेचच या भेटीचे परिणाम दिसणार नसले, तरी दोन पक्षांमधले ताणलेले संबंध निवळण्यास आता सुरुवात होईल, अशी आशा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांसह अन्य प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरू केले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बहुचर्चित भेटीत काय होणार, याबद्दल दिवसभर अनेक अंदाज व्यक्त होत होते.
दिवसभरात सिनेतारका माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांना भेटल्यानंतर संध्याकाळी साडेसात-पावणेआठच्या सुमारास अमित शहा ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याखेरीज भाजपचा कुणीही नेता नव्हता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ‘मातोश्री’वर आगमन होताच उद्धव यांचे सुपुत्र आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

शहा-उद्धव यांच्यात दोघातच खलबते

‘मातोश्री’च्या तळमजल्यावरील खास दालनात चहा-पाणी झाल्यानंतर अमित शहा यांना घेऊन उद्धव दुसर्‍या मजल्यावर गेले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे ज्या मजल्यावर पाहुण्यांना भेटत असत, त्याच मजल्यावर आणि त्याच दालनात शहा आणि उद्धव या दोघांच्यातच काही काळ गुफ्तगू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे देखील या चर्चेत सहभागी झाले. ‘मातोश्री’वर शहा आणि मुख्यमंत्र्यांसाठी ढोकळा, खांडवी या गुजराती मेनूबरोबरच आमरस आणि खास मराठी बटाटेवडा असा बेत ठेवण्यात आला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे रंगशारदामध्ये शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर निघून गेले. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर दानवे यांना ‘मातोश्री’वर आणू नये, असा निरोप उद्धव यांच्याकडून पाठवला गेल्याची चर्चा होती, मात्र खुद्द दानवे यांनी याचा इन्कार केला.

संजय राऊत भेटीपासून दूर

शिवसेनेची समजूत काढण्यासाठी शहा येणार असल्याने युतीचे मारेकरी म्हणून ओळखले जाणार्‍या खासदार संजय राऊत यांनाही या बैठकीपासून दूरच ठेवले गेले होते.

शहा दोन तास ‘मातोश्री’वर

अमित शहा हे सुमारे दोन तास ‘मातोश्री’वर होते. या काळात ते आणि उद्धव, त्यानंतर मुख्यमंत्री शहा  आणि उद्धव व आदित्य ठाकरे तसेच पुन्हा उद्धव आणि अमित शहा अशा बैठकांच्या तीन-चार फेर्‍या झाल्या. या वेगवेगळ्या चर्चामध्ये नेमके काय झाले हे समजू शकले नसले, तरी आगामी काळातल्या राजकारणाबद्दल तसेच शिवसेनेने सोबत रहावे यासाठी अमित शहा यांनी उद्धव यांना विनंती केल्याचे समजते. उद्धव यांनी मात्र महाराष्ट्रातील भाजपकडून होत असलेली कुचंबणा, अपमान याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच उद्धव यांनी अनेक तक्रारी केल्याचेे समजते.

भाजपाध्यक्षांनी त्यांच्या खास शैलीत मोठ्या प्रेमाने उद्धव यांची समजूत काढली आणि यापुढे असे काही होणार नाही, असे आश्‍वासन दिले. दोन्ही पक्षांमधील मतभेदांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर वारंवार अशा बैठका घेण्याचे आज ठरवण्यात आले.

कडवटपणा कमी झाल्याची चर्चा

अमित शहा ‘मातोश्री’वर पोहोचल्यावर त्यांचे स्वागत आदित्य ठाकरेंनी केले होते. मात्र, या बैठकीनंतर स्वतः उद्धव ठाकरे अमित शहा यांना सोडायला ‘मातोश्री’बाहेर आले. त्यामुळे संवादानंतर या नेत्यांमधील कडवटपणा कमी झाल्याची चर्चा होती.