Thu, May 23, 2019 20:30
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'या' मुद्द्यावरून शहा-ठाकरेंचं जमलं नाही

..म्‍हणून 'मातोश्री'वर युतीची बोलणी फिसकटली!

Published On: Jun 08 2018 1:59PM | Last Updated: Jun 08 2018 1:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या जुन्या मित्राला मनवण्यासाठी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बुधवारी झालेल्या या भेटीनंतर पुन्‍हा युतीच्या चर्चाही सुरू झाल्या परंतु त्यातून काहीही साध्य झाले नसून आपण स्‍वतंत्रच लढणार असल्याचे घुमजाव शिवसेनेने केले. तरीही भाजपचे रुसलेल्या मित्राला मनवण्याचे प्रयत्‍न सुरूच राहणार आहेत. त्याबाबत भाजप नेते आशावादी असल्याचेही एका ज्येष्‍ठ भाजप नेत्यांनी सांगितले. 

भाजपच्या एका वरीष्‍ठ मंत्र्यांनी सांगितले की, आम्‍ही युतीबाबत अजूनही आशावादी आहोत. महायुती वाचविण्यासाठी पुन्‍हा एकदा पक्षाध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात. दोन्‍ही पक्षांमध्ये लोकसभा एकत्र लढण्यावर एकमत झाले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या जागावरून युतीची चर्चा फिसकटली, असेही त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीवर एकमत

शहांच्या मातोश्री भेटीत शिवसेना व भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्यावर एकमत झाले होते. दोन्‍ही पक्ष २०१४ च्या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढण्यात तयार झाले होते. तेव्‍हा ४८ पैकी २६ जागांवर भाजप तर २२ जागांवर निवडणूक लढविली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. विधानसभेसाठी भाजपने १२२ जागांची मागणी केली होती. मात्र शिवसेनेला हे मान्य नव्‍हते, असे मंत्र्यांनी सांगितले. विशेष म्‍हणजे २०१४ मध्ये दोन्‍ही पक्षांनी स्‍वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. तेव्‍हा भाजपने २६० जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने २८२ पैकी ६३ जागांवर विजय मिळविला होता. 

मुख्यमंत्र्याची निष्‍कलंक छबी : भाजपकडून पुरस्‍कार

शहा-ठाकरे चर्चेदरम्यान भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र यांची मजबूत आणि निष्‍कलंक कारभाराचे उदाहरण दिले. तसेच नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत जागा मागितल्या. परंतु, तरीही यावर शिवसेना तयार झाली नाही. त्यामुळे चर्चा रोखण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, वेगळे लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिला आहे. कारण काँग्रेस आणि भाजप एकत्र लढणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जास्‍त जागा निवडून येतील अशी भीती भाजपने व्यक्‍त केली आहे. 

पुन्‍हा होणार चर्चा

बुधवारी झालेल्या चर्चेतून भलेही युतीची बोलणी पुढे गेली नसोत परंतु अमित शहा यांनी लवकरच पुन्‍हा भेट घेणार असल्याचे म्‍हटले आहे. तसेच अमित शहा यांच्यामध्ये कोणताही अहंकार नाही. युती टिकविण्यासाठी ते कितीही वेळा मातोश्रीवर जाण्यास तयार आहेत, असेही एका मंत्र्यांनी सांगितले.