Fri, Dec 13, 2019 18:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा’

‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा’

Published On: Jun 26 2019 3:20PM | Last Updated: Jun 26 2019 3:20PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले. संसदेत कामकाज सुरू झाले आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक वेगवेगळ्या प्रकारे आंदोनल करत राज्य सरकारचा निषेध करत आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी माझ्या शापामुळेच शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चांगलाच असंतोष निर्माण झाला होता. प्रज्ञा यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या वेशात येत विधानभवनात प्रवेश केला. 

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी  वेषांतर केले होते. गजभिये यांनी हातात एक फलक घेतला होता. यावर लिहिण्यात आले होते की, ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शहीद झालो’. विधानभवनाच्या गेटजवळ पोलिसांनी गजभिये यांना अडवण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला होता. 

 प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना शाप दिला होता. त्यामुळेच त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला’, असे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रकाश गजभिये हे हेमंत करकरे यांच्या वेशात आले होते.

मागील अधिवेशनात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोशाखात प्रवेश केला होता. तर एकदा संभाजी भिडे यांच्या आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश कला होता.